17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा! पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

574

अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या सुनावणीची डेडलाइन सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाने घटवली आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पक्षांना आता 17 ऑक्टोबरपर्यंत आपला युक्तिवाद संपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमच्या कोर्टाकडून तोडगा निघेल अशी आशा असणाऱयांनी आपला युक्तिवाद 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा असा सल्लेवजा इशाराही या प्रकरणाची रोज सुनावणी करणाऱया घटनापीठाने पक्षकारांना दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ यंदा 17 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वीच या खटल्याचा निकाल देण्याचे संकेतच सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय पूर्णपीठाने आपल्या निर्देशातून दिले आहेत. आवश्यकता भासल्यास दैनंदिन सुनावणीचा कालावधी एक तासाने वाढवण्याचीही तयारी न्यायालयाने दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत सर्व पक्षांना आपले युक्तिवाद संपवावेच लागणार आहेत. त्यानंतर निकाल तयार करण्यासाठी खंडपीठातील न्यायाधीशांनी चार आठवडय़ांचा वेळ दिला जाईल. यापूर्वीदेखील युक्तिवादासाठी अधिक वेळ देण्याची मागणी मुस्लिम पक्षकारांनी केली होती. त्यावर 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद संपेल. यासाठी आपल्याला मिळून प्रयत्न करायला हवेत. गरज भासल्यास एक तासाने आम्ही सुनावणीचा वेळ वाढवू शकतो. गरज पडलीच तर शनिवारीदेखील सुनावणी घेतली जाईल, असे आश्वासनही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मुस्लिम पक्षकारांना दिले .

सर्व पक्षकारांनी न घाबरता बाजू मांडावी

अयोध्याप्रकरणी सुनावणीदरम्यान, हिंदू पक्षकारांनी 16 दिवसांत आपली बाजू मांडली. त्यानंतर आता मुस्लिम पक्षकार आपली बाजू मांडत आहेत. दरम्यान, मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी सोशल मीडियातून आपल्याला धमकी मिळाल्याचा उल्लेखही कोर्टात केला होता. त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, सर्व पक्षकारांनी न घाबरता आपली बाजू कोर्टात मांडावी. कुणीही कोणाच्या दबावाखाली राहण्याची गरज नाही.

आपली प्रतिक्रिया द्या