अयोध्या खटल्यासाठी आम्हाला वेळ हवाय! कश्मीरच्या याचिकांवर सुनावणीस सरन्यायाधीशांचा नकार

434

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने सोमवारी नकार दिला. आम्हाला अयोध्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी घ्यायची आहे. त्यामुळे कश्मीरसंबंधी विविध याचिकांवर सुनावणी करण्यास आमच्याकडे वेळ नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

अनेक याचिकांमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. तसेच कश्मीर खोऱ्यातील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवेवरील निर्बंध उठवण्याची मागणी करणारी जनहित याचिकाही दाखल झाली आहे. या सर्व याचिका सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणीसाठी आल्या. त्यावर आम्हाला अयोध्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणाची नियमित सुनावणी करण्यास वेळ हवाय, असे स्पष्ट करत सरन्यायाधीशांनी कश्मीरसंबंधित सर्व याचिका सुनावणीसाठी दुसऱ्या घटनापीठाकडे पाठवल्या.

दुसऱ्या घटनापीठापुढे आजपासून सुनावणी
कलम 370 आणि कश्मीरसंबंधित सर्व याचिकांवर न्यायाधीश एन.व्ही.रामणा यांच्या नेतृत्वाखालील पाचसदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. या घटनापीठात न्यायाधीश एस. के. कौल, आर. सुभाष रेड्डी, बी. आर.गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश आहे. सरन्यायाधीशांनी सोमवारी या घटनापीठाकडे सर्व याचिका पाठवताना केंद्र सरकारला नोटीसही बजावली.

अब्दुल्लांच्या अटकेसंबंधी नवी याचिका करण्याचे निर्देश
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या अटकेविरोधात राज्यसभेचे खासदार वायको यांनी याचिका दाखल केली. मात्र या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयाने त्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत नवीन याचिका दाखल करण्यास सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या