उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन, 10 कार्यकर्त्यांना अटक

कोरोना प्रादुभार्वात शासनाच्या प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करून आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विनापरवानगी आंदोलन केले. या प्रकरणी 10 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसलेनगर परिसरातील घरासमोर आंदोलन करीत पोलीस उपनिरीक्षकासोबत झटापट केली. याप्रकरणी पोलिसांनी पक्षाच्या 10 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

भिमराव दत्तू कांबळे, अभिजीत मधुकर गायकवाड, रफिक रूस्तूम शेख, अंकित परशुराम गायकवाड, दर्शन बाबुराव उबाळे, दत्ता मोहन भालशंकर, विनोद लक्ष्मण वाघमारे, महेश वैजनाथ थोरात, सागर विरभद्र जवई, शरद गौतम लोखंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय नोकरीतील एस.सी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण शासनाने रद्द केल्याचा गैरसमज आझाद समाज पार्टीने केला होता. त्यानुसार कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसलेनगर परिसरातील घरासमोर विनापरवागनी आंदोलन केले.

कोरोना प्रादुभार्वात सुरू असतानाही संबंधिताने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत घोषणाबाजी केली. त्याशिवाय शासन आदेश जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी ताब्यात घेताना त्यांनी फिर्यादी माळी यांच्यासोबत झटापट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या