पाकिस्तानने कमी लेखले, पण आम्ही त्यांना वेळीच ठेचले; हवाई दल प्रमुखांचे स्पष्टीकरण

245

पाकिस्तानने हिंदुस्थानला नेहमीच कमी लेखले, पण आम्ही त्यांना वेळच्या वेळीच ठेचले. पाकिस्तानला हिंदुस्थानची ताकद ठाऊक होती. बालाकोट एअरस्ट्राइक होण्यापूर्वी आम्ही अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊ याची त्यांना कल्पनाच नव्हती. पण आम्ही ते करून दाखवले, अशा शब्दात हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी शुक्रवारी आपले मत व्यक्त केले. धनोआ याच महिनाअखेर निवृत्त होत आहेत.

मुंबईत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या धनोआ यांनी सांगितले, पाकिस्तानने आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाला नेहमी कमी महत्त्व दिले. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा 1965 सालीही पाकिस्तानने आपल्याला कमीच लेखले. कारगिल युद्धातही पाकिस्तान चकित झाले. आम्ही आमच्या जवानांच्या हातात बोफोर्स बंदुका देऊन सीमेवर धाडू असे पाकला वाटले नव्हते. पण हवाई दलाने कारवाई करत शत्रूला बाहेर हुसकावून लावले. पुलवामा येथे हल्ला केल्यावरही पाकिस्तान निर्धास्त होते. पण आम्ही बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला, असेही धनोआ यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले. हिंदुस्थानी हवाई दल प्रत्युत्तर देऊ शकते याची खात्री पाकिस्तानला आहे. आमची ताकदही त्यांना ठाऊक आहे. आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना ठोकून काढू शकतो याची कल्पना आता त्यांना नक्कीच आली असेल, असेही एअरचीफ मार्शल धनोआ आपल्या भाषणात पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या