अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात गुन्हे शाखेने चौथ्या आरोपीला पकडले. हरीशकुमार निशाद (26) असे त्यांचे नाव असून त्याला यूपीतल्या बहराईच जिह्यातील गंडारा गावातून उचलण्यात आले. हत्याकांडाच्या कटात निशादचा सक्रिय सहभाग होता. त्याला आज न्यायालयात हजर केले असता अन्य तिघा अटक आरोपींप्रमाणे 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारच्या रात्री वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात बाबा सिद्दिकी यांची भररस्त्यात गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचवेळी पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरनेल सिंह यांना पकडले होते. त्यानंतर दोघांच्या चौकशीत व तांत्रिक तपासात पुण्यातला प्रवीण लोणकर याचा या हत्याकांडात सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यालाही या गुह्यात अटक करण्यात आली. दरम्यान, प्रवीण व शुभम या लोणकर भावांच्या दूध डेअरीच्या बाजूलाच हरीशकुमार निशाद याचा भंगाराचा व्यवसाय होता. या निशादचा बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे समोर आले, मात्र घटनेच्या दिवसांपासून तो आपला व्यवसाय बंद करून गावाकडे पसार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने यूपीतल्या बहराईच जिह्यातील गंडारा गावात धडक देऊन निशादला उचलून आणले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सिद्दिकी हत्याकांडात निशादची भूमिका स्पष्ट होत असल्याने त्याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे म्हणत पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने निशादला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
घटनास्थळी बॅगेत पिस्तूल सापडले
खेरनगर येथे घराकडे जाण्यासाठी गाडीत बसत असताना बाबा सिद्दिकी यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांना घटनास्थळ परिसरात आज एक बॅग सापडली. त्या बॅगेत पिस्तूल आणि एक आधारकार्ड सापडल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांना घटना घडली त्या परिसरात बॅग आणि त्यात पिस्तूल सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तिघे आरोपी एकाच गावचे
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी शिवकुमार गौतम, धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह असे तिघे गेले होते. त्यातील शिवकुमार हा गोळय़ा झाडून पसार होण्यात यशस्वी झाला, तर अन्य दोघे पोलिसांच्या हाती लागले. कश्यप, गौतम आणि निशाद हे तिघे एकाच गावचे आहेत.
स्नॅप चॅटवर चर्चा
लोणकर यांच्या डेअरीवर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजला, पण आरोपी इतर वेळी याबाबत बोलताना समाजमाध्यमांचा वापर करायचे. स्नॅप चॅटवर आरोपी चॅटिंग करायचे तसेच बोलण्यासाठी इन्स्टा कॉलिंगचा वापर करायचे.