आधी कर्णधारपद गेले; आता संघातूनही हकालपट्टी! उर्वरित कसोटी मालिकेतून बाबर आझमला डच्चू

सततच्या खराब फॉर्ममुळे अलीकडेच बाबर आझमला पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता पाकिस्तानच्या नव्या संघनिवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी बाबरला संघातून डच्चू देण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघात चार मोठे बदल करण्यात आले आहेत.

तीन माजी कर्णधारांना संघातून वगळले

पाकिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघात पाकिस्तानने बाबर आझम, शाहीन आफ्रिदी व नसीम शाह या माजी कर्णधारांसह युवा वेगवान गोलंदाज सरफराज अहमद यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर कर्णधारपद वाचवण्यासाठी शान मसूदला आणखी एक संधी देण्यात आली आहे. शान मसूदशिवाय सौद शकीलचे उपकर्णधारपद कायम ठेवले आहे. या चार खेळाडूंच्या जागी हसीबुल्ला, मेहरान मुमताज, कामरान गुलाम, वेगवान गोलंदाज मोहम्मद अली आणि ऑफस्पिनर साजिद खान यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला पहिल्या कसोटी संघाचा भाग असलेला; पण नंतर बाहेर केलेल्या नोमान अली आणि जाहिद महमूद यांचाही 16 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

उर्वरित कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ 

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.

बाबर पाच वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार?

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आल्यानंतर आता बाबर आझम पाकिस्तानच्या देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेच्या आगामी कायद-ए-आझम ट्रॉफीत खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून तो या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला दोन डावांत केवळ 35 घावा करता आल्या. गेल्या 18 डावांत त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्यावरील दबाव वाढला आहे. बाबर आझमने 2019 पासून एकही प्रथमश्रेणी सामना खेळलेला नाही.