आयसीसीच्या तंबीनंतर पाकिस्तानचा यू टर्न! टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभाग निश्चित; संघ जाहीर

बहिष्काराच्या चर्चांनी वातावरण तापलेले असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अखेर माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलत टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची अधिकृत घोषणा केली आहे. एवढेच नव्हे, तर पीसीबीने थेट १५ सदस्यीय संघ जाहीर करून सर्व अफवांना जोरदार चपराक दिली आहे.

बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानही स्पर्धेतून बाहेर पडणार, अशा चर्चा जोर धरत होत्या. मात्र, ‘आयसीसी’कडून ‘माघार घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा मिळताच पीसीबी अॅक्शन मोडमध्ये आले. परिणामी सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा टी-२० विश्वचषकातील प्रवेश निश्चित झाला आहे.

निवड समितीने यावेळी कोणतीही तडजोड न करता ‘संतुलित पण आक्रमक’ संघावर शिक्कामोर्तब केले आहे. चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचे दमदार पुनरागमन. काही काळ संघाबाहेर असलेली ही जोडी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या विजयाची आशा पल्लवित करत आहे. फलंदाजीची जबाबदारी बाबरकडे, तर वेगवान गोलंदाजीचा मारा शाहीन आणि नसीम शाहकडे असेल.

मात्र, निवड प्रक्रियेत मोठे धक्केही देण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज हारिस रऊफला संघाबाहेर ठेवण्यात आले असून, गतवर्षीच्या आशिया कपमधील खराब फॉर्म आणि फिटनेस प्रश्न यामागे कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर अनुभवी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानलाही बिग बॅश लीगमधील सुमार कामगिरीची किंमत मोजावी लागली आहे. राजकारण, दबाव आणि क्रिकेट या तिन्हींच्या कात्रीत अडकलेला पाकिस्तान अखेर मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे.

पाकिस्तानचा टी-२० विश्वचषक संघ

सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर झमान, ख्वाजा मोहम्मद नफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान (यष्टीरक्षक) आणि उस्मान तारिक.