बबलू ठाकूरची महिला साथीदार गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेरीवाल्याकडून खंडणी वसूल करणारी बबलू ठाकूरची महिला साथीदार आयेशा शेख ऊर्फ लता पवारला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दादर स्थानक परिसरात बसणाऱ्य़ा फेरीवाल्यांकडून खंडणी उकळणाऱ्य़ा बबलू ठाकूर, त्याची पत्नी आणि काही साथीदारांना दादर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या चौकशीत आयेशाचे नाव समोर आले होते. पोलीस पकडतील या भीतीने आयेशा ही पळून गेली होती. ती सोलापूर येथे तिच्या भावाकडे गेल्याची माहिती दादर रेल्वे पोलिसांना मिळाली. तिच्या अटकेसाठी सोलापूरच्या कारंबा पोलीस ठाण्याची मदत घेतली.

सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांचे पथक सोलापूरला गेले. तेथून आयेशाला अटक करून मुंबईत आणले. आयेशा ही बबलूची साथीदार आहे. ती फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करत असायची. जो फेरीवाला खंडणी देणार नाही त्याचे नाव ती बबलू ठाकूरला सांगत असायची. त्यानंतर ठाकूर हा त्या फेरीवाल्यांना मारहाण करत असायचा. खंडणीतून आयेशाला दिवसाला एक हजार ते दोन हजार रुपये हे बबलूकडून मिळत असायचे. तिने खंडणीच्या पैशातून मुंबईत काही संपत्ती केली आहे का, याचा तपास दादर रेल्वे पोलीस करत आहेत.