बाबरी मशीद प्रकरण : कल्याण सिंह यांना सीबीआय न्यायालयाचे समन्स

932

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कल्याण सिंह यांना 27 सप्टेंबरला सीबीआय न्यायालयात हजर राहण्यासाठी सीबीआयने समन्स पाठवले आहे. कल्याण सिंह यांचा राजस्थानच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपला. त्यामुळे सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी त्यांच्याविरोधात समन्स बजावले.

बाबरी मशीद तोडल्याप्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर आरोपींवर बाबरी मशीद पाडण्याला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. सिंह यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सीबीआयने 9 सप्टेंबरला त्यांच्याविरोधात समन्स बजावावे, अशी याचिका न्यायालयात केली होती.

मुख्यमंत्री ते राज्यपाल

अयोध्येत 1992मध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली त्यावेळी भाजपचे कल्याण सिंह हे मुख्यमंत्री होते. 1993 मध्ये बाबरी मशीद तोडण्याला चिथावणी दिल्या प्रकरणात सीबीआयने त्यांच्याविरोधात आरोपपत्रात दाखल केले. 2017 सालापासून ते राजस्थानचे राज्यपाल होते. राज्यपालांना राज्यघटनेने दिलेल्या विशेष संरक्षणामुळे त्यांच्याविरोधात समन्स बजावता आले नाही. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपल्यानंतर सीबीआय न्यायालयाने त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या याचिकेवर समन्स बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या