कळवणच्या रस्त्यांची दुरवस्था

68
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । कळवण

तालुक्यातील गुजरात राज्याला जोडणाऱ्या कनाशी ते हातगड व अभोणा ते बोरगाव या प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. अवजड वाहनांमुळे या रस्त्यांची दुरवस्था झालीच आहे, त्यात पावसाची संततधार सुरू असल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. या खड्डय़ांत गाडय़ा आदळून अपघात घडत आहेत. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कळवण तालुका हा शेती व्यवसाय असलेला तालुका आहे. यात कांदा, मक्यासह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. यात मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर, कोथंबीर, शिमला मिरची भाजीपाला हा गुजरात राज्यातील बिल्लमोरा, सुरत, अहमदाबाद, धरमपूर या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो. यापूर्वी हा रस्ता अवजड वाहनांना पार करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लागत असे, मात्र  खड्डय़ांमुळे सध्या हा रस्ता पार करण्यासाठी दोन तास वेळ लागत आहे तर काही वाहनधारक नांदुरी, वणीमार्गे सापुतारा जात आहेत.

अवजड वाहनांमुळेच तालुक्यातील रस्त्यांची पावसाळय़ाआधीच दुरवस्था झाली होती. यात कळवण-अभोणा-खिराड-बोरगाव हा 27 किमी रस्ता व अभोणा-कनाशी-दळवट-जिरवाडा-हातगड हा 28 किमी रस्ता तसेच रवळजी फाटा ते रवळजी गाव, देसराणे, नाळीद ते जयदर हा 10 किमी रस्ता अक्षरशः खड्डय़ात गेला आहे. पावसाळय़ाआधीच या रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु लोकप्रतिनिधी व आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे रस्ते खड्डेमय झाले आहेत.

दंड वाचवण्यासाठी रस्त्यांचा वापर
वणी-सापुतारा रोडवरील राज्य परिवहन अधिकाऱयांच्या चेक पोस्टवर क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहणाऱ्या अवजड वाहनांना दंड आकारला जातो. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणारे व महाराष्ट्रातून गुजरात राज्यात जाणाऱ्या अनेक वाहनधारकांना कळवण-कनाशी-हातगड रस्ता माहीत असल्याने हे अवजड वाहने आरटीओचा दंड वाचविण्यासाठी या मार्गाने जात आहेत. वर्दळ वाढल्याने रस्त्यांची वाट लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या