Ind Vs Aus टीम इंडियासाठी तिसऱ्या दिवसाची खराब सुरुवात, 81 धावात गमावले चार गडी

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबविण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर सुरू झाला. मात्र तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणेने 37 तर मयांक अगरवालने 38 धावा केल्या. सध्या वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर मैदानावर आहेत. टीम इंडिया अद्याप 129 धावांनी पिछाडीवर आहे.

फलंदाजीसाठी पोषक असलेल्या गॅबाच्या खेळपट्टीवर नव्या दमाच्या हिंदुस्थानी गोलंदाजांनी चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शनिवारी प्रभावी कामगिरी केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 369 धावांवर रोखण्यात यश मिळविले. टी. नटराजन व वॉशिंग्टन सुंदर या गोलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीतच 3-3 बळी घेण्याचा पराक्रम केला. दुसरी कसोटी खेळत असलेल्या शार्दुल ठाकूरनेही 3 फलंदाज बाद करून आपली छाप सोडली. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानने उर्वरित 26 षटकांच्या खेळात 2 बाद 62 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून पहिल्या डावात ते अजून 307 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 8, तर कर्णधार अजिंक्य रहाणे 2 धावांवर खेळत होते. पावसामुळे चहापानानंतर पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही.

रोहितला मोठी खेळी करण्यात अपयश

शुभमन गिल व रोहित शर्मा या सलामीवीरांना या डावात अपयशाचा सामना करावा लागला. पॅट कमिन्सने दुसऱ्याच षटकात शुभमनला 7 धावांवर स्मिथकरवी झेलबाद करून कांगारूंना सनसनाटी सुरुवात करून दिली. अर्धशतकाच्या उंबरठय़ावर रोहित शर्मा (44 धावा) बेजबाबदार फटका मारून बाद झाला. नॅथन लायनला मैदानाबाहेर भिरकावण्याच्या नादात त्याने स्टार्ककडे झेल दिला. या मालिकेत रोहित शर्माला चांगली सुरुवात लाभली आहे, पण याचे मोठय़ा खेळीमध्ये रूपांतर करण्यात तो सातत्याने अपयशी ठरत आहे.

35 षटकांच्या खेळावर पाणी

हिंदुस्थानने 26 षटकांत 2 बाद 62 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर चहापानासाठी खेळ थांबला. मात्र त्यानंतर पावसाची बॅटिंग सुरू झाल्याने दोन तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला. म्हणजेच जवळपास 35 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. मात्र रविवारी सकाळी अर्धा तास आधी खेळ सुरू होणार असल्याची माहिती पंचांनी दिली.

तासाभरानंतर 3 षटकांत 3 बळी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या 5 बाद 274 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार टीम पेन (50) व कॅमरून ग्रीन (47) यांनी सहाव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करीत आपल्या संघाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानने 3 षटकांत 3 बळी टिपल्याने ऑस्ट्रेलियाची 5 बाद 311 अशा मजबूत स्थितीतून 8 बाद 315 अशी दाणादाण उडाली. मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने शंभराव्या षटकात टीम पेनला रोहितकरवी झेलबाद करून ही डोकेदुखी ठरू पाहणारी जोडी फोडली.

71 वर्षांनंतर जुळून आला योग

टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या गोलंदाजांचे पदार्पण लक्षवेधी ठरले. अनुभवी गोलंदाजांच्या गैरहजेरीत या दोघांनी 3-3 फलंदाज बाद केले. हिंदुस्थानच्या दोन गोलंदाजांनी 1949 साली पदापर्णाच्या कसोटीत 3-3 बळी टिपले होते. त्यावेळी वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटीत हिंदुस्थान संघामधून गुलाम अहमद आणि मंटू बॅनर्जी यांनी पदार्पण केले होते. या सामन्यात अहमद आणि बॅनर्जी यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले होते. तब्बल 71 वर्षांनंतर हा योग पुन्हा जुळून आला.

आपली प्रतिक्रिया द्या