बदलापूर शहरात आंदोलन सुरू झाले आहे. पण या आंदोलनात तुम्ही सहभागी झालात तर खबरदार.. हे समाजकंटक तुम्हीच आणलेत, तुम्ही त्यांची माथी भडकवलीत असे गुन्हे तुमच्या अख्ख्या कुटुंबावर दाखल करू. तुम्हाला त्याचा त्रास होईल लक्षात ठेवा.. अशी धमकीच बदलापूर पोलिसांनी पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांना दिल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडल्यानंतर न्याय देण्याऐवजी बदलापूर पोलिसांनी तब्बल दहा दिवस पीडित मुलीच्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप दिला आणि वारंवार धमक्या दिल्या. त्यामुळे हे अख्खे कुटुंबच मानसिक तणावाखाली आले आहे. आम्हाला न्याय मिळेल याची आता खात्रीच वाटत नाही, असे हताश उद्गारही त्यांनी काढले.
11 ऑगस्ट रोजी आदर्श विद्यालयात सफाई कामगार नराधम अक्षय शिंदे याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. 13 ऑगस्टला ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी आधी शाळेत धाव घेतली. पण शाळा प्रशासन आणि संस्थेच्या चालकांनी हे प्रकरण झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.
तुमची मुलगी सायकलवरून पडल्याने दुखापत झाली असेल; आदर्श शाळेच्या संस्थाचालकांचा कांगावा
तुम्ही खोटे बोलताय.. हे खोटे आहे.. आमच्या आवारात अशी घटना घडलेलीच नाही. सायकल चालवताना तुमची मुलगी पडली असेल आणि दुखापत झाली असेल. तुम्ही इथून ताबडतोब निघून जा, असा कांगावा करत हे प्रकरण झटकून टाकण्याचा प्रयत्न शाळेच्या शिक्षकांनी आणि संस्थाचालकांनी केला. पण आमच्याकडे मेडिकल रिपोर्ट आहे, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितल्यानंतर शाळेची बोलती बंद झाली. मात्र त्यानंतर तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांचा अक्षरशः छळच सुरू झाला. अकरा तास ताटकळत ठेवल्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस स्टेशन ते शाळा, शाळा ते पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन ते हॉस्पिटल अशा फेऱ्या त्यांना पोलिसांनी मारायला लावल्या. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी त्यांना जितका त्रास देता येईल तितका त्रास यंत्रणांनी दिला, त्यामुळे पीडित चिमुकलीच्या गर्भवती आईची प्रकृतीही खालावली आहे, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
आंदोलकांची माथी तुम्हीच भडकवली, असे गुन्हे दाखल करू
20 ऑगस्टला बदलापूरकरांनी पोलीस यंत्रणा, शाळा आणि सरकारचा धिक्कार करत आंदोलन सुरू केले तेव्हा तर पोलीस या कुटुंबासोबत अक्षरशः जनरल डायरसारखे वागत होते. पोलीस आम्हाला सारखे धमकावत होते. या आंदोलनात तुम्ही सहभागी झालात तर याद राखा.. आंदोलकांची माथी तुम्ही भडकवायचा प्रयत्न केला, असे तुमच्यावर गुन्हे दाखल करू. यावर आम्ही कोणालाही बोलवले नाही. आंदोलन करणाऱ्यांना आम्ही ओळखतही नाही, असे पीडितेच्या कुटुंबाने सांगताच मग तसे आम्हाला लिहून द्या, अशी दमबाजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केली.
रोज अधिकारी येतात आणि आमचे एकच स्टेटमेंट वारंवार घेतात
या घटनेनंतर रोज वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी आमच्या घरी वेळी अवेळी येतात आणि एकच स्टेटमेंट वारंवार घेतात. आम्ही प्रचंड तणावात आलो आहोत. आम्हाला आता न्याय मिळेल याची काहीही खात्री उरलेली नाही. आम्हाला न्यायच द्यायचा असेल तर त्या आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणीही त्यांनी केली.