दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल करीत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला अक्षरशः फोडून काढले. त्यानंतर आज सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीने बदलापूरच्या आदर्श विद्या प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापन, प्रशासनाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर शाळेचा सफाई कामगार नराधम अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्यानंतरही शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्युमोटो दाखल करून सरकारवर सणसणीत आसूड ओढले होते.
दहा दिवसांनंतर अखेर कारवाई
सरकारने नेमलेल्या एसआयटीने शाळेचे व्यवस्थापन आणि प्रशासनाविरोधात पोक्सो कलम (21) अन्वये गुन्हा दाखल केला. पालकांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापन आणि प्रशासनाने याबाबत तातडीने पोलिसांना कळवणे बंधनकारक होते. मात्र बदनामी होऊ नये म्हणून शाळा प्रशासन आणि व्यवस्थापनाने हात झटकले होते.