बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. नराधम अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर केलेल्या अत्याचारानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण दोन्ही गुन्ह्यांबद्दल एकच एफआयआर करण्यात आला होता. त्यामुळे आता दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानुसार दुसऱ्या चिमुकलीवरील अत्याचाराचा स्वतंत्र गुन्हा गुरुवारी नराधम अक्षय शिंदेवर दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरमधील एका शाळेत 12 ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकलींवर अत्याचार केले. मुलींच्या पालकांनी तक्रार करूनही 11 तासानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले होते. यावेळी विविध संस्थांनी बंदची हाक दिली होती. आता या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर अत्याचाराचे स्वतंत्र गुन्हा गुरुवारी अक्षय शिंदेवर दाखल करण्यात आले आहेत.