बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या सहा-सात तासांपासून आंदोलन सुरू होते. आंदोलक संतप्त झाले असून आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत रेल्वे ट्रॅकवरून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. अखेर पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला. त्यांनी आंदोलन पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.यावेळी जमावाला रेल्वे रुळांवरुन हटविण्यात आले.
आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तासभर आंदोलकांशी बोलूनही त्यांना यश आले नाही. अखेर आता पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन पांगवले, पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरून जरी आंदोलकांना पांगवलं असलं तरी आजूबाजूच्या परिसरातून हे आंदोलक दगडफेक करत असल्याची माहिती आहे.