बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर नराधम सफाई कामगार अक्षय शिंदे याच्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. पीडित चिमुकलीला गंभीर इजा झाली असून तिच्यावर पंधरवड्यात अनेक वेळा अत्याचार झाल्याचा रिपोर्ट दोन सदस्यीय समितीने नोंदवला आहे.
चिमुकल्यांवर झालेला लैंगिक अत्याचार, शाळेने हे प्रकरण दाबण्यासाठी केलेला प्रकार आणि तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी केलेले अकरा तास दुर्लक्ष याविरोधात जनप्रक्षोभ उसळल्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमली. या समितीने गेल्या चार दिवसांपासून सखोल चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
प्रकरण दडपण्यासाठी मुख्याध्यापक, व्यवस्थापनाचा खटाटोप
चौकशी समितीने आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात 10 शिक्षक, पाच सफाई कामगार आणि दोन लिपिकांचा समावेश आहे. हा प्रकार लिपिकाने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कानावर घातला होता. मात्र त्यानंतर मुख्याध्यापक आणि शाळेच्या ट्रस्टींनी तो गांभीर्याने घेतला नाही. त्यांनी निष्काळजीपणा केल्याचे ताशेरेही समितीने ओढले आहेत.
- या घृणास्पद कृत्याची तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापन दोन दिवस शांत राहिले. तक्रारीनंतर प्रशासनाने पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली नाही.
- पीडितेवर उपचार करण्यासाठी बारा तासांचा कालावधी लावला.
- हे संवेदनशील प्रकरण हाताळण्यासाठी कोणतीही संवेदनशीलता अधिकाऱ्यांनी दाखवली नाही.
- हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही, चौकशीही केली नाही.
- स्वच्छतागृह निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे. सुरक्षिततेसाठी योग्य सीसीटीव्ही बसवलेलेच नाहीत.
मनोधैर्य वाढवण्यासाठी मनोविकारतज्ज्ञांची नियुक्ती
पीडित मुलींना या धक्क्यातून सावरण्यासाठी बालहक्क सुरक्षा आयोगाच्या वतीने दोन मनोविकारतज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. हे तज्ज्ञ या मुलींबरोबर राहणार आहेत असे बालहक्क सुरक्षा आयोगाच्या पल्लवी जाधव यांनी सांगितले.
चार दिवसांनी ‘आदर्श’ची घंटा वाजली
आदर्श शाळा चार दिवस बंद होती. शुक्रवारी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शनिवारी पहिल्या टप्प्यात या शाळेतील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.
महिला पत्रकार विनयभंग प्रकरण; ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार
बदलापूर येथील चिमुकलींच्या लैंगिक छळ प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून तिचा विनयभंग केल्याप्रकरणाचा आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार आहे. याप्रकरणी फिर्यादी महिला पत्रकाराचा जबाब आज सहाय्यक पोलीस आयुक्तांनी नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी मिंधे गटाचा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे.