बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र अजिंक्यपद स्पर्धा – हिंदुस्थानची हाँगकाँगवर मात! उपांत्यपूर्व फेरीत जपानशी भिडणार

इंडोनेशियात सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने गट चरणातील विजयी घोडदौड सुरू ठेवताना हाँगकाँग चायनावर 110-100 असा विजय मिळवला आणि ‘ड’ गटातून अव्वल स्थान काबीज केले. आता उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानची गाठ जपानशी पडणार आहे. गट ‘अ’मध्ये जपानने थायलंडनंतर दुसऱया स्थानावर मजल मारली आहे.

हिंदुस्थान आणि हाँगकाँग चायना हे दोन्ही संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र झाले होते, मात्र विजयी लय कायम राखणे आवश्यक असल्याने हिंदुस्थानने या सामन्यासाठी बलाढय़ खेळाडूंना संधी दिली. रुजुला रामू हिने नेहमीप्रमाणे हिंदुस्थानला विजयी सुरुवात करून दिली. तिने आयपी सम याऊ हिचा 11-8 असा पराभव केला. त्यानंतर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानच्या भर्गव राम अरिगेला आणि विश्व तेज गोब्बुरू या दुहेरी जोडीने च्युंग साई शिंग आणि डेंग ची फाई यांच्यावर विजय मिळवत हिंदुस्थानची आघाडी 22-13 अशी वाढवली.

हाँगकाँगच्या लॅम का तो याने आपल्या संघासाठी 13 गुण मिळवत आघाडी कमी केली, मात्र हिंदुस्थानच्या रौनक चौहानने गुण वाढवत आपल्या देशाच्या संघाची आघाडी 33 पर्यंत नेली. पाच सामन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये केवळ सहा गुणांचे अंतर होते (55-49). मात्र त्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या तन्वी शर्माने दुसऱया मुलींच्या एकेरीत लिऊ होई किउ अॅनाचा सहज पराभव करून हिंदुस्थानची आघाडी पुन्हा मजबूत केली. तन्वीच्या विजयानंतर हिंदुस्थानी संघ 66-54 असा आघाडीवर गेला. यानंतरच्या चारही लढती अटीतटीच्या झाल्या, मात्र हिंदुस्थानने आघाडी कायम राखत सामना जिंकला आणि गटात अव्वल स्थान पटकावले.