सायना, कश्यप, गुरुसाईदत्तचा सराव सुरू; दोन आठवडय़ांनंतर गोपीचंद अॅकॅडमीत जाणार

233

ऑलिम्पिकशी निगडित असलेल्या बॅडमिंटनपटूंच्या सरावासाठी हैदराबाद येथील साईची पुलेला गोपीचंद अॅकॅडमी खुली करण्यात आली आहे. मात्र तिथे आतापर्यंत पी. व्ही. सिंधू, एन. सिक्की रेड्डी व साई प्रणीत हेच खेळाडू सराव करीत आहेत. सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप व आरएमव्ही गुरुसाईदत्त हे खेळाडू या अॅकॅडमीनजीक असलेल्या छोटय़ाशा ठिकाणी सराव करीत आहेत. आगामी दोन आठवडय़ांनंतर सायना नेहवाल गोपीचंद अॅकॅडमीत सरावाला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याबाबत पारुपल्ली कश्यप म्हणाला, सायना नेहवाल हिने आताच सरावाला सुरुवात केली आहे. आता ती फिटनेससाठी मेहनत करीत आहे. त्यानंतर ती गोपीचंद अॅकॅडमीत जाणार आहे. याबाबत प्रशिक्षक पुलेला गोपीचंद व इंडोनेशियाचे प्रशिक्षक ऍग्यूस सॅण्तोसो यांनाही कळवण्यात आले असून परवानगीही घेण्यात आली आहे.

चार-पाच खेळाडूंमध्ये कशीकाय ट्रेनिंग होऊ शकते?

हैदराबादमध्ये बॅडमिंटनपटूंच्या ट्रेनिंगला सुरुवात झाली असली तरी कोरोनामुळे काही बॅडमिंटनपटूंना हैदराबादमध्ये पोहोचता आलेले नाही. यावर पारुपल्ली कश्यप म्हणाला, सध्या गोपीचंद अॅकॅडमीत कमी खेळाडू सराव करीत आहेत. बॅडमिंटन हा तसा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ नाही. त्यामुळे येथे जास्तीत जास्त खेळाडू यायला हवेत. पार्टनर असल्यामुळे सराव करताना फायदा होतो. चार ते पाच खेळाडूंमध्ये किती काळ तुम्ही सराव करू शकाल? असा प्रश्नही त्याने यावेळी उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या