14 वर्षाचा ‘वनवास’ संपला! बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत व वैशिष्ट्य

2227

‘बुलंद भारत की बुलंद तसबीर…हमारा बजाज’ ही बजाज ऑटोच्या ‘चेतक’ या स्कूटरची जाहिरात आजही अनेकांना आठवत असेल. 1972 पासून 34 वर्षे हिंदुस्थानच्या रस्त्यांवर दिमाखात धावणार्‍या चेतकची विक्री 2006 पासून बंद करण्यात आली होती. आता पुन्हा 14 वर्षांनी बजाज चेतक (Bajaj Chetak electric scooter) नव्या आधुनिक रूपात दाखल झाली आहे. बजाज ऑटोने आपली ही पहिलीच इलेक्ट्रिक चेतक स्कूटर लॉन्च केली आहे.

bajaj-chetak1

विविध सहा रंगांमधील बजाज चेतकला इको आणि स्पोर्टस् मोड देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऍण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम, लिथियम आयन बॅटरी, मोनोशॉक सस्पेन्शन, दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक, टय़ूबलेस टायरही त्यात आहे. चाकण येथील प्रकल्पात या नव्या चेतकचे उत्पादन सुरू करण्यात आले असून 15 जानेवारीपासून स्कूटर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागतील.

bajaj-chetak

देशात दुचाकी बनवणार्‍या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरला ही स्कूटर सादर करण्यात आली होती. आता 14 जानेवारीला ही स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या स्कूटरची विक्री आधी पुण्यात होणार आहे. त्यानंतर बंगळुरू व अन्य शहरांमध्ये ही स्कूटर उपलब्ध करून देण्यात येईल.

bajaj-chetak4

किंमत किती?
सुरुवातीला चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केटीएम शोरूममध्ये होईल, असे कंपनीने सांगितले. ही स्कूटर इको आणि स्पोर्टस या दोन व्हेरिएन्टमध्ये देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर इको मोडमध्ये ही स्कूटर 85 किलोमीटर आणि स्पोर्टस मोडमध्ये 95 किलोमीटर चालेल. तसेच कंपनी स्कूटरवर 3 वर्ष किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी देईल. या स्कूटरची एक्स शो रूम किंमत 1 लाख रुपये असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या