हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू आणि काँग्रेस नेता बजरंग पूनियाला अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बजरंगने तत्काळ सोनीपत बहलगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बजरंग पुनियाला व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आला आहे. मेसेजमध्ये लिहले आहे की, बजरंग काँग्रेस सोडून दे नाहीतर तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही दाखवून देऊ आम्ही काय चीज आहे ते. जिथे तुला तक्रार करायचा आहे तिथे कर, ही आमची पहिली आणि शेवटची ताकीद आहे, असे बजरंगला आलेल्या मेसेजमध्ये लिहले आहे. धमकीचा मेसेज आल्यानंतर, बजरंगने तत्काळ सोनीपत बहलगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.