आम्ही कधीही सूट मागितली नाही! बजरंग, विनेश चाचणी स्पर्धेसाठी तयार

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बजरंग पुनिया व विनेश फोगाट यांना ट्रायलमध्ये सूट दिल्याने काही कुस्तीपटूंनी या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र आम्ही कधीही ट्रायलमध्ये सूट मागितली नव्हती. आम्ही चाचणी स्पर्धेसाठी तयार आहोत, अशी भूमिका बजरंग आणि विनेश यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत मांडली.

परदेशात पळून नव्हे, तर सरावासाठी आलोय!

महिला कुस्तीपटू अंतिम पंघालने आमच्याविरुद्ध केस केली असल्याने आम्हाला न्यायालयाकडून परदेशात नोटिसा आल्या आहेत. पंघाल आपल्या ठिकाणी योग्यच आहे. तिला तिचा हक्क मिळायलाच हवा. मात्र तिला आमच्यावर केस करायला लावली, हे दुर्दैव आहे. लहान असल्यामुळे तिला अजून तेवढी समज आलेली नाहीये. बजरंग अन् विनेशला हरविणारे बरेच आहेत, असे काही कुस्तीपटू म्हणाले, मात्र आम्ही आजपर्यंत हरलेलो नाही हेदेखील सत्य आहे. आम्ही परदेशात पळून आलेलो नाही, तर सरावासाठी आलेलो आहे. आमचीही चाचणी स्पर्धा घ्या, आम्ही तयार आहोत, असा पलटवार बजरंग आणि विनेश यांनी केला.