।।प्रभु अजि गमला, मनी तोषला।।

573

>> आसावरी जोशी 

बालगंधर्व या पाच अक्षरांभोवती सात्त्विक सौंदर्याचे, जादुईऊ स्वरांचे, सुरांचे अजरामर वलय. 19व्या शतकातील हे नाटय़वैभव संगीत रंगभूमीवर पुन्हा अवतरत आहे. त्यानिमित्ताने गंधर्वयुगाचा सुंदर प्रवास…

बालगंधर्वांचे गंधर्वयुग… झगमगतं ग्लॅमर कसं असतं हे आपल्या मराठी रंगभूमीने खऱया अर्थाने 19व्या शतकातील गंधर्वयुगात अनुभवले. अत्यंत किमती, भरजरी साड्या, सोने-मोती-हिऱयाचे खरे दागिने… उंची अत्तरे… प्रत्येक नाटय़ प्रयोगानंतर प्रत्येक कलावंताला मिळणारा पेशवाई पंगतीचा लाभ आणि बरंच इ.इ. कारण खरोखरच ही यादी न संपणारी. नाटकाचे नेपथ्य जेवढे श्रीमंत आणि समृद्ध तसेच नाटक आणि नाटकाचा मखमली गंधर्वस्वर…

रंगभूमीच्या या सुवर्णकाळाची 1905 साली जेव्हा नारायण श्रीपाद राजहंस या पोरसवदा तरुणाचे किर्लोस्कर नाटक मंडळीत आगमन झाले तेव्हाच नांदी झाली. 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर 37 वर्षांनी संगीत नाटक सुरू झाले. शास्त्रीय संगीताची भारदस्त बैठक… समृद्ध साहित्य, अर्थपूर्ण शब्दरचना… ठुमरी, टप्पा, कजरी असे संगीताचे सुरेल प्रकार अर्थपूर्ण नाटकांमधून सहज सामावले गेले…

फुलले… या सुवर्णस्वरांची जादू जाणकार रसिकांच्या आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे आजच्या तरुणाईच्या मनावरही गारुड करून आहे. या गंधर्वसुरांच्या शोधातूनच आकाश भडसावळे हा तरुण रंगकर्मी संगीत बालगंधर्व ही कलाकृती मराठी संगीत रंगभूमीवर आणतो आहे. काही सुरांना, स्वरांना, व्यक्तिमत्त्वांना काळाचे मापदंड कधीच नसतात. बालगंधर्वांच्या रूपाची…स्वरांची… अभिजात नाटय़कलेची जादू अशीच कालातीत.

प्रत्येक कलाकारांच्या दोन बाजू असतात. त्याची एक बाजू नेहमी झगमगत्या प्रकाशात, त्याच्या सौंदर्यात उजळून निघालेली असते, तर दुसरी बाजू नेहमीच पडद्याआडच्या अंधारात असते. हे वास्तव अत्यंत कटु स्वरूपात बालगंधर्वांच्याही वाटय़ाला आले. आपण केवळ त्यांची झगमगती बाजू पाहिली तरीसुद्धा आजच्या तरुणाईला या ग्लॅमरमधून खूप काही घेण्यासारखे व शिकण्यासारखे आहे. कलेवरील, संगीतावरील निस्सीम प्रेम… त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी, कलेशी इमान, प्रचंड मेहनत, मृदू, विनयशील वृत्ती. बालगंधर्वांच्या या साऱयाच गोष्टी प्रत्येकाने घेण्यासारख्या आहेत. ते स्वतः तरुणाईत रमत, तरुणांना प्राधान्य देत त्यामुळेच की काय त्यांच्या स्वरांची, सौंदर्याची मोहिनी आजच्या तरुणाईसही पडते व याही पुढे पडत राहील.

l आपल्या बहिणीच्या घरी नारायणाचा मुक्काम हलला आणि त्याला त्याची दिशा सापडली. बहिणीचे यजमान प्रतिष्ठीत वकील. नाटय़कलेत अतोनात रस त्यामुळे अनेक कलाकारांचा मुक्काम त्यांच्या घरी असे. या कलाकारांच्या हुबेहूब नकला छोटा नारायण करीत असे.
l बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर ‘संगीत नाटक मंडळी’ मध्ये 1905 साली सुरू झाली. नाटय़गीतांसह खयाल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते या सर्व गायन प्रकारांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
l नारायणाचा संगीताकडे ओढा पाहून त्याच्यासाठी संगीत शिक्षकाची नियुक्ती केली. त्याचे पहिले संगीत शिक्षक मेहबूब खान. पुढे दहा वर्षांच्या नारायणाला लोकमान्यांसमोर गाण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने बालगंधर्वांचा जन्म झाला.
l संगीत सौभद्र’, ‘मृच्छकटीक’, ‘मानापमान’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘एकच प्याला ’ अशा एकूण पंचवीस नाटकांमधून नायिकेच्या भूमिका करून या प्रत्येक नाटकाची नायिका बालगंधर्वांनी अजरामर केली. किंबहुना एक आदर्श नायिका, आदर्श पत्नी, प्रेयसी कशी असावी याचा वस्तुपाठच त्यावेळच्या कुलीन स्त्रियांपुढे बालगंधर्वांनी ठेवला.
l बालगंधर्व हे त्यांच्या आई-वडिलांचे अकरावे अपत्य. घरची गरिबी, पण संगीताचा वारसा मात्र समृद्ध. नारायणाचे वडील स्वतः उत्तम गायक व वादक होते. पहाटे भूपाळी आळवणे हा त्यांचा आवडता छंद. आई व मावशीच्या सुरेल ओव्यांच्या संस्कारात नारायण मोठा झाला.
l प्रेक्षकांसाठी खास गाडय़ांची सोय करणारी गंधर्व ही एकमेव नाटय़संस्था होती.
l बालगंधर्वांची नाटके पाहण्यासाठी भाषा, प्रांत आड येत नव्हते. महाराष्ट्राबाहेरून अनेक रसिक आगाऊ तिकिटे राखून ठेवत. त्या काळात बालगंधर्वांच्या नाटकाच्या तिकिटांचे दर शंभर व दोनशे रुपये असत.
l गंधर्वांचे नाटक सहकुटुंब पाहणे हा प्रतिष्ठित घरंदाज स्त्रियांसाठी एक आनंद सोहळा असे. त्यांच्यासारख्या साड्या, दागिने स्त्रियांनी करणे ही त्या काळची प्रतिष्ठत फॅशन होती.
l स्वतःच्या सौंदर्याची विशेष काळजी नारायणराव घेत असत. रोजचे केशरयुक्त दुधाचे स्नान, अत्यंत एकांतात तासन्तास चालणारी रंगभूषा आणि वेशभूषा हे नारायणरावांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य. लुगडे नेसवण्यासाठी खास व्यक्तीची नेमणूक होती. एकदा लुगडे परिधान केले की त्यावर चुणी पडेल म्हणून नारायणराव बसतही नसत. नाटक संपल्यानंतर दरदिवशी संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाला शाही भोजनाचा लाभ मिळत असे.
l ‘एकच प्याला’तील सिंधू सर्व नायिकांवर कळसाध्याय ठरली. सोशिक, स्वाभिमानी, त्यागी, पतिपरायण सिंधूला रसिकांची सर्वाधिक पसंती होती.
l अत्यंत मृदु स्वभाव, मृदु भाष्य हे गंधर्वांचे वैशिष्ट्य. कठोर शब्द उच्चारणे त्यांना ठाऊक नव्हते. पैशासाठी ते कधीही गात नसत. नगरला केवळ पस्तीस रुपये गल्ला जमलेला असतानाही संपूर्ण नाटकाचा थाटमाट तोच होता.
l या सर्व नायिकांची वेशभूषा, केशभूषा, साजशृंगार हे मराठी रंगभूमीवरील ग्लॅमरस नेपथ्य होते. अतिशय उच्च प्रतीची वस्त्रप्रावरणे, चांदीचे, हिरे-मोत्यांचे अस्सल खरे दागिने, उंची अत्तरे हे बालगंधर्वांच्या नाटकाचे खरे वैशिष्ट्य. हा सर्व डामडौल गंधर्वांच्या स्वराने, रूपाने आणि अभिनयाने सहज पेलला होता.
l नारायणराव नेहमीच तरुणाईत रमत. सतत तरुण रक्ताला वाव देण्याकडे त्यांचा कल होता. चित्रपती व्ही. शांताराम यांना पहिली संधी बालगंधर्वांनी दिली. बहुधा यामुळेच बालगंधर्व हे चिरतरुणच राहिले.
l सांगलीतील नागठाणे येथे 26 जून 1888 रोजी जन्मलेले नारायण श्रीपाद राजहंस हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य.
l ‘द्रौपदी वस्त्रहरणा’साठी त्या काळी संपूर्ण रंगमंचाचा खर्च 75 हजार रुपये झाला होता.
l स्वतःचे कुटुंब आणि नाटक यामध्ये त्यांनी नेहमीच नाटकाला प्रथम प्राधान्य दिले. त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या शुभारंभाच्या वेळी त्यांचे एकेक अपत्य काळाने हिरावून नेले, पण शकुंतला, भामिनी, सिंधू, द्रौपदी या नायिका कालचक्रावर मात करून गंधर्वांच्या मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ठामपणे उभ्या राहिल्या.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या