बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती! – अजित पवार

2780

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळी करण्यात आलेली अटक ही वरिष्ठांच्या हट्टापायी करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती, असा मोठा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झालेली अटक चुकीची असल्याचे सांगितले. त्या काळात आमचेही स्वतःचे मत होते की, इतक्या टोकाचे राजकारण कोणी करू नये, त्या वेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. त्या वेळी काही जणांच्या हट्टापायी तसे करण्यात आल्याचे ते म्हणाले.

बाळासाहेबांना अटक करण्याच्या निर्णयाबाबत आम्ही त्या वेळी संबंधित व्यक्तीला विचारले की, असं का करताय? तेव्हा ते म्हणाले, आम्ही विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटते तो निर्णय घेणार आहोत, असे आपल्याला सांगण्यात आल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला. वास्तविक असं कुणाच्याही बाबतीत करू नये, असेही ते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळ्या आईच्या मांडीवर खेळलेले पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार नाही. आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय, काँग्रेस-राष्ट्रवादी थकलेत हे विधान कदाचित सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतःच्या वयावरून केले असावे, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीस यांना पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याची इच्छा!

माझ्या कारकिर्दीला साडेचार कर्षं झाल्यानंतर मी वेगळा विदर्भ करेन, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. वेगळ्या राज्याचा ठराक करून ते तेलंगणासारखे विदर्भ हे वेगळे राज्य करणार होते. पण कालांतराने त्यांना वेगळ्या विदर्भाऐवजी पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याची इच्छा झाली, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या