बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी वाढीव 362 चौरस मीटर जागा

349

शिवाजी पार्क महापौर बंगला येथे होणाऱया हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वाढीव 362.04 चौरस मीटर जागा मिळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. पालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत वाढीव जागा मिळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे महापौर पिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. त्यामुळे आता एकूण 11913.05 चौरस मीटर जागेकर ही भव्य वास्तू उभारली जाणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावाती जीवनप्रवास बाळासाहेब ठाकरे स्मारकात उलगडला जाणार आहे. शासनाने महापौर बंगला व परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यताही दिलेली आहे, मात्र या ठिकाणच्या 362.04 चौरस मीटर जागेबाबत केरलिया महिला समाज विरुद्ध मुंबई महानगरपालिका यांच्यात उच्च न्यायालयात दावा सुरू होता. हा दावा निकाली निघाल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव जागा मिळण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी याआधीच मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेतही मांडण्यात आला. यावेळी वाढीव जागा मिळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

लवकरच काम सुरू होणार
बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्याबाबत मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करारही अलीकडेच झाला आहे. स्मारकासाठी 11551.01 चौरस मीटर जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडे नोव्हेंबर 2018 मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. शिवाय स्मारकासाठी पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानग्या याधीच मिळाल्या आहेत. यानुसार महापौर बंगल्याच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता या परिसरातील जमिनीखाली बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. आता वाढीव जागाही मिळाल्यामुळे स्मारकाचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या