आठ हजार सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांना स्थगिती, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

544

राज्यातील 22 जिल्हा मध्यवर्ती बँका आणि 21 हजार सोसायट्यांपैकी सुमारे 8 हजार सेवा सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या कामात कर्मचारी गुंतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

1 फेब्रुवारीपासून राज्यात ऑनलाइन लिंकिंगच्या साह्याने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार असून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. लवकरच अशा शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील. नियमित कर्ज भरणाऱ्यां शेतकऱ्यांसाठीही एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहणार आहे असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीचे प्रशासकीय पातळीवर काम सुरू असून या कामाकरिता प्रत्येक स्तरावर कर्मचारी काम करीत आहेत. या कामामुळे मुदत संपलेल्या राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि विकास सोसायटींच्या निवडणुका 3 महिने लांबणीवर टाकल्याची माहिती देऊन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम प्रामुख्याने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच गावोगावच्या सेवा सोसायट्यांवर आहे. त्यामुळेच कर्जमाफी योजनेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी राज्यातील 22 जिल्हा मध्यवर्ती बँका आणि 21 हजार सोसायट्यांपैकी सुमारे 8 हजार सेवा सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आले आहेत असे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या