बालमोहन शाळेकडून ‘स्कूलबस नियमावली’ धाब्यावर, ट्रॅव्हल कंपनीच्या बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण

631

दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेने ‘स्कूलबस नियमावली’ धाब्यावर बसवलेल्या आहेत. पिवळ्या रंगाच्या स्कूलबसमधून विद्यार्थी वाहतूक करण्यात यावी असा नियम असूनही या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण ट्रव्हल कंपनीच्या बसमधून सुरू आहे. बसमध्ये प्रथमोपचार पेटी आणि अग्निसुरक्षा यंत्रणाही नसल्याचे उघड झाल्याने यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे मुंबई महापालिका शिक्षण समिती सदस्य, युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी बालमोहन विद्यामंदिराकडून होणाऱ्या स्कूलबस नियमावलीच्या उल्लंघनासंदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. 14 सप्टेंबर 2011 रोजी शिक्षण विभागाने सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूलबस नियमावली जाहीर केली. त्याअंतर्गत प्रत्येक शाळेमागे एक परिवहन समिती असणे, विद्यार्थ्यांचा ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व बसेस या अधिकृत असाव्यात, त्यांचा रंग पिवळा असावा, स्कूलबसमध्ये अग्निशमन यंत्रणा, प्रथमोचार सुविधा या गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वाहनाच्या कागदपत्रांची योग्य ती तपासणी करूनच संबंधित व्यक्तीवर स्कूलबसची जबाबदारी सोपवणे गरजेचे आहे.

परिवहन समितीने सदर गोष्टींची पडताळणी करून त्या अमलात आणणे अपेक्षित आहे. मात्र बालमोहन विद्यामंदिर या शाळेच्या स्कूलबसची अवस्था पाहता या नियमावलीचे पालन होत नाहीच, असे साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण समितीच्या निदर्शनास आणून दिले. शाळेकडून स्कूलबसच्या नावाखाली ट्रॅव्हल कंपनीची बस वापरली जात आहे. सदर बस अनधिकृत असून बसमध्ये प्रथमोपचार सुविधा नाही. या शाळेच्या बहुसंख्य स्कूलबस या सफेद व इतर रंगाच्या असून त्यावर स्कूलबस असा उल्लेखही केलेला नाही. याप्रकरणी शाळेबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही दुर्गे यांनी शिक्षण समिती अध्यक्षांना केली.

आपली प्रतिक्रिया द्या