
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेने पर्यावरण रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. शाळेने ‘शून्य कचरा परिसर’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत ई-कचरा, प्लॅस्टिक आणि कागद जमा करण्यासाठी शाळेच्या आवारात स्वतंत्र व योग्यरीत्या लेबल केलेले डबे ठेवले आहेत. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र काwतुक होत आहे.
बालमोहन विद्यामंदिरातील या उपक्रमाचा उद्देश योग्य विल्हेवाट, पुनर्वापर व पुनर्निर्मिती आहे. ओल्या कचऱ्याचे पंपोस्ट खत, पावसाचे पाणी साठवण्याचा प्रायोगिक प्रकल्प, बीज गोळय़ांची निर्मिती, विद्यार्थी आणि पालकांसाठी जनजागृती कार्यशाळा आदी उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पर्यावरणीय शिक्षणाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे. ‘इकोक्लब-मिशन लाईफ’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव विकसित केली जात आहे.
‘जागरूकतेने आणि जबाबदारीने निर्माण करूया स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पर्यावरण’ हे शाळेचे ध्येय असून बालमोहन परिवारातील पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचवत आहेत.