पाकिस्तानी सैन्यासाठी बलुच फिदायीन महिला ठरल्या काळ; लष्करी ठिकाणांना केले लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानात बलुचिस्तान मुक्तीसाठी संघर्ष करणाऱया बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या 40 तासांपासून भीषण चकमक सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याचे 200 पेक्षा जास्त कर्मचारी ठार केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केला आहे . या हल्ल्यात बीएलएने काही आत्मघाती हल्ले केले. त्यात दोन महिला आत्मघाती हल्लेखोरांचाही समावेश होता. दोघींचा मृत्यू झाला आहे. क्वेट्टा आणि नोश्की येथे अजूनही बीएलएचे हल्लेखोर असून या ठिकाणी पाकिस्तानच्या लष्कराला परतावून लावण्यात आल्याचा दावा बीएलएने केला आहे.

बलुचिस्तानातील क्वेट्टा, नोश्की, खरान, मुस्टंग, टंप आणि पश्नी या भागांत शनिवारी मोठे हल्ले केले होते. त्यात ‘आयएसआय’च्या कार्यालयासह सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या मोहिमेला ‘बीएलए’ने ‘ऑपरेशन हेरॉफ-2’ असे नाव दिले होते. ‘बीएलए’चा प्रवक्ता जीयंद बलोच याने याबाबत माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानी सैन्याचे 200 पेक्षा जास्त कर्मचारी ठार करण्यात आले असून 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही आकडेवारी प्राथमिक आहे, प्रत्यक्ष आकडा वाढू शकतो. नोश्की येथील पोलीस उपायुक्त मुहम्मद हुसैन हाजरा आणि सहायक पोलीस आयुक्त मारिया शामू यांना ताब्यात घेऊन नंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून सोडून देण्यात आले. त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने 130 पेक्षा जास्त बंडखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे.

महिला आत्मघाती हल्लेखोरांचा प्रथमच वापर

‘बीएलए’ने केलेल्या हल्ल्यांमध्ये प्रथमच महिलांचा वापर करण्यात आला आहे. आसिफा मेंगल आणि हावा बलोच या दोन महिला हल्लेखोरांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. त्यात दोघींचा मृत्यू झाला आहे. आसिफा मेंगल ही 22 वर्षीय तरुणी 2024 मध्ये आत्मघाती हल्लेखोर बनली. स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन तिने नुश्की येथे आएसआयच्या मुख्यालयावर हल्ला केला, तर हावा बलोच हिने ग्वादार येथील मोहिमेत पाकिस्तानी सैन्यासोबत लढली. मोहीम सुरू होण्यापूर्वीचा तिचा एक व्हिडीओदेखील ‘बीएलए’ने पोस्ट केला आहे.