
टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार, पण हिंदुस्थानविरुद्ध नाही हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा निर्णय त्यांच्यासाठी दोन गुण गमावणारा नव्हे, तर आपल्या क्रिकेटला धोक्यात आणणारा ठरणार आहे. या निर्णयाचे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा आयसीसीने पीसीबाला दिला आहे. या इशाऱयानंतर पाकिस्तान आपला निर्णय मागे घेतो की निर्णयावर ठाम राहतो हे लवकरच कळेल.
चार दिवसांवर आलेल्या टी-20वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे होणाऱया हिंदुस्थानविरुद्धच्या साखळी लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल पाकिस्तान सरकारने घेतल्यानंतर त्यांच्या क्रिकेटला फार गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याची शक्यता कालच वर्तवण्यात आली होती. पाकिस्तानच्या निर्णयानंतर वर्ल्ड कपमधील सर्व पात्र संघांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार समान अटींवर खेळणे अपेक्षित असते. स्पर्धेतील निवडक सहभाग ही भूमिका स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांनाच छेद देणारी आहे. या निर्णयाचा फटका केवळ जागतिक क्रिकेटलाच नव्हे, तर स्वतः पाकिस्तानमधील क्रिकेटच्या भवितव्यालाही बसू शकतो, असे नमूद करताना आयसीसीने पीसीबीला पुढील परिणामांची कल्पना दिली.
पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भूमिकेबाबत अद्याप पीसीबीकडून अधिकृत पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही. मात्र, ‘खेळातील प्रामाणिकपणा, सातत्य, स्पर्धात्मकता आणि न्याय या मूल्यांवर आयसीसी स्पर्धा उभ्या आहेत. सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या मूल्यांना बाधा आणणारा आहे,’ असेही आयसीसीने आपल्या निवेदनात पीसीबीला बजावले.
अजूनही तोडगा काढा
वर्ल्ड कप हा सर्वांचा आहे. त्यामुळे जागतिक चाहत्यांचे हित, स्पर्धेचे यश आणि सर्व भागधारकांचे हित जपणारा तोडगा शोधणे ही पीसीबीची जबाबदारी आहे. टी-20 विश्वचषक यशस्वीपणे पार पाडणे हे सर्व सदस्यांचे सामूहिक कर्तव्य असल्याचेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.
कोटय़वधींचा सामना, पण धोका स्वतःचाच
15 फेब्रुवारीचा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना हा स्पर्धेतील सर्वाधिक व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचा मानला जातो. अशा सामन्याला मुकल्यास आयसीसीवर याचा परिणाम होईल, ज्याचा लाभार्थी स्वतः पाकिस्तानही आहे याचीही आठवण आयसीसीने करून दिली.
गुण आणि नेट रनरेटवर गदा
जर पाकिस्तानने 15 फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार घातला तर त्यांना दोन गुण गमवावे लागतीलच, शिवाय त्यांच्या नेट रनरेटवरही मोठा फटका बसेल. आयसीसीच्या नियमांनुसार, बहिष्कृत संघाच्या संपूर्ण 20 षटकांचा विचार नेट रनरेट गणनेत केला जाईल, तर हिंदुस्थानच्या नेट रनरेटवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.


























































