युवा शक्तीच्या प्रगतीसाठी संघ प्रशिक्षण देणार – भय्याजी जोशी

आगामी वर्षाकरिता संघाच्या काही योजना आहेत. संपूर्ण देशातून संघाने 18 ते 25 आणि 26 ते 35 या वयोगटाच्या एक लाख युवक निवडले आहेत. कार्य वेगाने पुढे नेण्याच्या दृष्टीने, त्यांना सुदृढ करण्याचा आणि त्यांची भूमिका निश्चित करण्याचा विचार करण्यात आला आहे. युवक आव्हानांचा सामना करीत जबाबदारी सांभाळू शकतात. युवा पिढीने प्रगती करावी या दृष्टीकोनातून त्यांच्या प्रशिक्षणासंबंधी विचार कऱण्यात आला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी केले. संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रतिनिधी सभा स्थगित करावी लागली आहे. आजपर्यंत असे कधीही झाले नाही, असेही ते म्हणाले. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक शनिवारी झाली. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकार्यवाह म्हणाले की, संघाचे कार्य मागील 95 वर्षे सुरू आहे. या काळात अनेक लोक संघाच्या या प्रवाहात आले. हे लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांत 15 लाख स्वयंसेवकांचे सर्वेक्षण (वय, शिक्षण, कार्य, आवड इत्यादी) करण्यात आले. या सर्व व्यक्तींचा सामाजिक परिवर्तनात कसा उपयोग करता येईल या दृष्टीने योजना तयार करून, त्यांच्या प्रशिक्षणाचा विचार करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांत टप्प्याटप्प्यांत ही योजना पूर्ण केली जाईल.

ते म्हणाले की, देशभरात सुमारे 39 हजार ठिकाणी दररोज 63 हजार शाखा लागतात. त्याव्यतिरिक्त 28 हजार स्थानी/गावांमध्ये संघाचे कार्य आहे. तसेच 10 हजार स्थानांवर संघाचे नियमित काम नसले तरी, आम्ही काही सुचविल्यास ते केले जाते. अशा प्रकारे 80 हजार ठिकाणी आमचे काम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शाखांमध्ये 3000ने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देशभरात आयोजित संघशिक्षा वर्गांमध्ये (20 व 25 दिवस) 15 हजार स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले.

भय्याजी जोशी म्हणाले की, बैठकीत तीन प्रस्ताव संमत करण्यात आले आहेत. पहिला, रामजन्मभूमीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला, त्याबद्दल सरकार आणि न्यायालय यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला. आंदोलनात बलिदान देणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करत हा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. दुसरा, संसदेने कलम 370 बाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाबाबत संमत करण्यात आला. संसदेने 370 रद्द केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करणारा प्रस्ताव आम्ही संमत केला आहे. तिसरा, बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून अत्याचार सहन करून हिंदुस्थानात आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व मिळावे सीएएमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता होती. सरकारने कायदा संमत केला, त्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो.

ग्रामविकासाचे लक्ष्य ठेवून आम्ही एक हजार गावे निश्चित केली आहेत. यांपैकी 300 गावांमध्ये चांगल्या गतीने कार्य सुरू आहे. ग्रामविकासाकरिता शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक समरसता आणि स्वावलंबन या मुद्द्यांच्या आधारे काम केले जाते, असे त्यांनी सांगितले.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, संघ औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही स्वरुपाच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करतो. केवळ औपचारिक माध्यमातून प्रशिक्षण होऊ शकत नाही.

जगात हिंदुस्थानाची कुटुंबव्यवस्था ही सर्वात वेगळी आहे. ती निर्माण झालेली नाही तर स्वाभाविक आहे. बरेचसे श्रेष्ठ गुण, संस्कार, विचार हे मुलांना कुटुंबात आईवडिलांकडून प्राप्त होतात. कुटुंब सुदृढ करण्यासाठी जागृती निर्माण करणे आवश्यक आहे, त्यासाठी कुटुंब प्रबोधनाचे कार्य केले जाते, असेही ते म्हणाले.

सीएएबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, दुर्दैवाने राष्ट्रीय विषय हा राजकीय झाला. राजकीय कारणांसाठी अनेक नेते समाजात संभ्रम निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी सरकारला समर्थन दिले पाहिजे. काही शंका असेल तर ती स्पष्टपणे मांडली पाहिजे.

सीएएचे समर्थन करणारी शक्ती बरीच मोठी आहे. अनेक संघटनांनी जागृती मोहीम सुरू केली आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहे. सर्व राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी या सकारात्मक मोहिमेला साथ दिली पाहिजे. केवळ भाजपच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांनी हे लक्षात घ्यावे असा आमचा आग्रह आहे. भाजप सत्तेत आहे, त्यामुळे त्यांनीही पुढाकार घेऊन जागृती मोहीम चालविली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या