बंगळुरूचे नेतृत्व एक धक्काच, रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली भावना

बंगळुरूच्या संघाचे कर्णधारपद सोपवले तेव्हाचा क्षण माझ्यासाठी धक्कादायक होता. सुरुवातीला काय करावे हेच मला समजत नव्हते, मात्र विराट कोहलीने मला शांत राहण्याचा सल्ला दिला. तसेच कर्णधारपदासाठी तू पात्र आहेस त्यामुळे ते तुला मिळाले असे सांगितल्यानंतर माझ्या जीवात जीव आला आणि मला धीर मिळाल्याची भावना बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली. बंगळुरू व्यवस्थापनाकडून आश्वासन देऊनही 2022 च्या आयपीएल मेगा लिलावात माझी निवड झाली नाही. त्यामुळे मला दुःख झाले होते. मात्र मी आशावादी होतो.

लिलावात निराशा झाल्यानंतर इंदूरमध्ये स्थानिक सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुखापतग्रस्त लवनिथ सिसोदियाच्या जागी मला खेळवण्यात आले. मात्र मला बदली खेळाडू म्हणून खेळायचे नव्हते, मला डगआऊटमध्ये बसायचे नव्हते. मी थोडासा चिडलो होतो. कोहलीसारखा दिग्गज खेळाडू असलेल्या संघाचे कर्णधारपद कसे असेल याबद्दल माझ्या मनात प्रश्न होते, मात्र कोहलीचा पाठिंबा होता. कोहलीचा अनुभव आणि कल्पना अतुलनीय आहेत. मी लहानपणापासून त्याला टीव्हीवर पाहत आलोय. त्याच्याकडून कर्णधारपद स्वीकारणे खूप खास होते, असेही पाटीदारने सांगितले. पाटीदारने आयपीएल 2025 मध्ये 11 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले. आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि मधल्या फळीत 239 धावा केल्या.