बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असून अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या बातम्या अवास्तव असल्याचे हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मोहमद युनूस यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात हिंदूना लक्ष्य करून हल्ले सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात येथील हिंसाचारात 650 लोकांचे बळी गेले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
16 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत झालेल्या हिंसाचारात बांगलादेशात 650 लोक मारले गेले आहेत. या मृतांमध्ये हिंदूंसह अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे, असे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने प्राथमिक अहवालात म्हटले आहे. लष्कर आणि सुरक्षा दलांची अतोनात दंडेलशाही, न्यायबाह्य हत्या, मनमानी अटक आणि ताब्यात घेणे या सगळय़ाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, असे अहवालात सुचवण्यात आले आहे.
असंतोषाच्या लाटेची सर्वाधिक झळ हिंदूंना
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदूंना 48 जिह्यांत 278 ठिकाणी हल्ले आणि धमक्यांचा सामना करावा लागला. बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायाची अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यवसायांना या असंतोषाची सर्वाधिक झळ पोहोचली, असे द बांगलादेश नॅशनल हिंदू ग्रँड अलायन्स संघटनेने म्हटले आहे. हा हिंदू धर्मावरील हल्ला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मानवाधिकार कार्यालयाचे ताशेरे
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनीही, बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध मानवी हक्कांचे उल्लंघन आणि हिंसाचार यासाठी सर्वसमावेशक, निःपक्षपाती आणि पारदर्शक तपास व्हायला हवा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, हसीना यांनी 5 ऑगस्टला दिलेल्या राजीनाम्यानंतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या सदस्यांवर हल्ले, लूटमार, जाळपोळीला ऊत आला होता.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
कर्फ्यू आणि इंटरनेट शटडाऊनमुळे हालचालींवर आलेल्या निर्बंधांमुळे माहिती संकलनात अडथळे येऊन मृतांची संख्या कमी नोंदवण्यात आली असण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे. शिवाय, रुग्णालयांना मृत आणि जखमींचा तपशील देण्यापासून राज्य यंत्रणेने प्रतिबंधित केले होते, असे अहवालात सुचवण्यात आले आहे. यामुळे मृतांची प्रत्यक्षातील संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अहवालात काय म्हटले आहे…
n ‘बांगलादेशातील अलीकडील निदर्शने आणि असंतोषाचे प्राथमिक विश्लेषण’ या शीर्षकाच्या 10 पानांच्या अहवालानुसार, 16 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान सुमारे 400 मृत्यूंची नोंद झाली आहे, तर शेख हसीना यांच्या हकालपट्टीस कारणीभूत ठरलेल्या 5 ते 6 ऑगस्टदरम्यान निषेध आंदोलनांच्या नवीन उद्रेकानंतर सुमारे 250 लोक मारले गेले आहेत.
n 16 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान, भेदभावविरोधी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनंतर झालेल्या हिंसाचाराच्या लाटेत 600 हून अधिक लोक मारले गेले, असा दावा प्रसारमाध्यमांद्वारे उपलब्ध सार्वजनिक माहिती आणि आंदोलकांच्या चळवळीनेच केला आहे. याच काळात बदला घेण्यासाठी म्हणून झालेल्या हल्ल्यांमध्ये नोंदवलेल्या मृत्यूंची संख्या अद्याप निश्चित करणे बाकी आहे, असे जिनिव्हा येथे गेल्या शुक्रवारी प्रसृत करण्यात आलेला अहवाल म्हणतो.
n 7 ते 11 ऑगस्ट या काळातही अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे, ज्यात हिंसाचारात जखमी झाल्यामुळे वैद्यकीय उपचार घेत असताना दगावलेल्यांचा समावेश आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्त कार्यालयाने अहवालात सूचित केले आहे.
n मारल्या गेलेल्यांमध्ये आंदोलक, बघे, पत्रकार आणि सुरक्षा दलांचे अनेक कर्मचारी यांचा समावेश आहे, असे अहवाल सांगतो. हजारो आंदोलक आणि बघेही जखमी झाले असून, या रुग्णांच्या गर्दीने रुग्णालये भरून गेली आहेत, असे अहवाल सांगतो.