शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीतील नाणी बँका स्वीकारणार

सामना प्रतिनिधी । शिर्डी

शिर्डीच्‍या साईबाबांच्या दानपेटीद्वारे जमा होणारी नाणी स्वीकारण्‍याबाबत बेलापूर येथे रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकेंच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत संस्थानच्या दानपेटीतील पैशांची मोजणी कुठल्‍याही परिस्‍थितीत थांबता कामा नये, असे आदेश रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिले आहेत

‘बॅंकेत जागेसंदर्भात काही अडचणी असल्‍यास त्‍यांनी संस्‍थानकडे जागा उपलब्‍ध आहे का, याची चाचपणी करावी. संस्‍थानने जागा देण्याबाबत तयारी दर्शविली आहे. जागेची पाहणी संस्‍थान व बॅंका यांनी संयुक्‍तरित्‍या करावी. जर बॅंकांना जागा पसंत पडली तर ती नाणी बॅंकांच्‍या कस्‍टडीत राहतील. संस्‍थान त्‍या ठिकाणी सीसीटीव्‍ही व सुरक्षा उपलब्‍ध करुन देईल. जमा होणाऱ्या नाण्यांवरील जे व्‍याज असेल ते व्‍याज बॅंका संस्‍थानला नियमितपणे देतील. अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेचे जनरल मॅनेजर के. कमला कन्‍नन यांनी दिल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुगळीकर म्‍हणाले, श्री साईबाबा संस्‍थानच्‍या दक्षिणापेटीतून जमा होणाऱ्या नाण्‍यांमुळे दानपेटीतील रक्‍कम मोजणीसाठी येण्‍यास बॅंका नकार देत होत्‍या. या संदर्भात बुधवारी बेलापूर येथे  रिझर्व्ह बॅंकेचे जनरल मॅनेजर के.कमला कन्‍नन यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मुंबईस्थित सर्व बॅंकांच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीस संस्‍थानचे मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.