कविंदरचा वर्ल्ड चॅम्पियनला दमदार ठोसा

सामना ऑनलाईन। बँकॉक

हिंदुस्थानच्या कविंदरसिंग बिष्ट याने बॉक्सिंगच्या रिंगणात जबरदस्त कामगिरी केली. या पठ्ठय़ाने वर्ल्ड चॅम्पियन कैरात येरालिएवला दमदार ठोसे लगावत आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पराभूत केले आणि अगदी रुबाबात अंतिम चारमध्ये प्रवेश केला. याचसोबत त्याचे या स्पर्धेतील पदकही पक्के झाले.
कविंदरसिंग बिष्ट व कझाकस्तानचा बॉक्सर कैरात येरालिएव यांच्यामध्ये 56 किलो वजनी गटात अटीतटीची लढत झाली. दोघांमधील रोमहर्षक लढतीचा निकाल ‘स्पिल्ट’द्वारे लावला गेला. याचसह सोनिया चहलने 57 किलो वजनी गटात कोरियाच्या जो सोन वाला पराभूत करीत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. दीपक सिंगला 49 किलो वजनी गटात अंतिम चारमध्ये प्रवेश करता आला. अफगाणिस्तानच्या रमीश रहमानी याने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे सोनिया चहलसह दीपक सिंगचे पदक निश्चित झाले.

लोवलीनाचा खेळखल्लास
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकणाऱया लोवलीना बोर्गोहेन हिचा खेळ खल्लास झाला. 69 किलो वजनी गटात तिला अपयशाला सामोरे जावे लागले. याचसह सीमा पुनियाला 81 पेक्षा अधिक किलो वजनी गटात, तर रोहित टोकासला 64 किलो वजनी गटात पराभवाचा चेहरा पाहावा लागला.