
आपल्याकडे चित्र आणि चित्रकारविषयक लेखन फारसे आढळत नाही. पुस्तक स्वरूपात असे लेखन अभावाने आढळते. प्रभाकर बरवे हे महाराष्ट्रातील थोर चित्रकार. 1986 ते 1995 च्या काळात ते महत्त्वाचे चित्रकार म्हणून सर्वपरिचित होते. त्यांनी रेखाचित्रांतून, रंगचित्रांतून मांडलेला दृश्यविचार पुढे नेऊ पाहणारी त्यांच्या शिष्यवर्गाची पिढी आहे, जी यात सातत्याने प्रयोगशीलता राखत आहे. महाराष्ट्रीय चित्रकारांच्या तीन पिढय़ांवर प्रभाव असणारे प्रभाकर बरवे यांच्या कलेचा चरित्रात्मक अंगाने वेध घेणारे पुस्तक ‘बरवे संचित’ येत्या काही महिन्यात प्रकाशित होत आहे. चिन्ह या कलावार्षिक नियतकालिकाचे सतीश नाईक यांचे हे पुस्तक प्रकाशित होण्यामागे महत्त्वाचे योगदान आहे. याआधी त्यांनी प्रभाकर बरवे यांच्या डायर्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रयत्न केले आहेत. बरवे यांच्या कलेला याआधी पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘कोरा कॅनव्हास’. त्यांच्या समग्र कला कारकिर्दीचा वेध आता पुन्हा ‘बरवे संचित’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. या माध्यमातून बरवे यांचा चित्रविचार कलारसिकांसमोर मांडला जात आहे. बरवे यांचा चित्रविचार समजून घेताना कलाविचारांचे साद्यंतरूप प्रत्येक रसिक नक्कीच अनुभवेल.

























































