‘बसपन का प्यार’ने उडवली अनुष्काची झोप, व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये

बालपणीचं प्रेम खूप निरागस आणि गोड असतं. असंच एक बालपणीचं प्रेमगीत सध्या लाखो लोक ऐकत आहेत. सोशल मीडियावर ‘बसपन का प्यार’ ट्रेंड करत आहे. एक शाळकरी मुलगा वर्गामध्ये ‘बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ गात आहे. त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या गाण्यामुळे माझी झोप उडालीय, अशी मिश्कील कबुली नुकतीच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने दिलीय.

मुलाचे नाव सहदेव दिरदो असून तो छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगड येथे राहतो. दोन वर्षांपूर्वीचा त्याचा व्हिडियो पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाला आहे. गंमत म्हणजे ‘बचपन’ऐवजी सहदेव ‘बसपन’ म्हणत आहे. या व्हिडियोची लोकप्रियता एवढी वाढलीय की रॅप गायक बादशहाने सहदेवशी संपर्क साधला आणि त्याला चंदिगडला भेटायला बोलावले. लवकरच सहदेव आणि बादशहाचे गाणे आले तर आश्चर्य वाटायला नको. अमेरिकेतील प्रसिद्ध डान्सर रिक पॉंड हादेखील या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. देशविदेशातील लोक ‘बसपन का प्यार’चे दिवाने झाले आहेत. या गाण्याचे कित्येक जण आपापल्या अंदाजात रिमेक व्हिडियो बनवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या