पिशवीसाठी ग्राहकाकडून तीन रुपये आकारले, बाटा कंपनीला 9 हजारांचा दंड

22
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । चंदीगढ

येथील बाटाच्या एका शोरूममध्ये ग्राहकाने शूज खरेदी केले, तेव्हा त्याला शूजसोबत देण्यात आलेल्या पिशवीसाठीही 3 रुपये बाटाने आकारले. या पिशवीमुळे उलट बाटा कंपनीचीच जाहिरात होणार होती. यामुळे ग्राहकाने बाटा कंपनीविरुद्ध ग्राहक संरक्षण मंचाकडे धाव घेतली होती. या प्रकरणावर निकाल देताना ग्राहक कक्षाने बाटा कंपनीला दोषी ठरवले आणि त्यांच्यावर 9 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी 4 हजार रुपये ग्राहकाला देण्यात यावेत असे निर्देशही ग्राहक कक्षाने दिले आहेत.

बाटाने कंपनीने आपल्या सेवेत कसूर केल्यामुळे आपल्याला 3 रुपये परत मिळावेत असे ग्राहकाने आपल्या तक्रारीत म्हटले होते. बाटानेही आपण सेवेत कसलीही कसूर केली नसल्याचे सांगितले. मात्र ग्राहक कक्षाने सांगितले की, वस्तू विकत घेतल्यानंतर ग्राहकाला कागदाची पिशवी मोफत देणे अपेक्षित आहे. ते बाटाने केले नाही असे कक्षाने म्हटले आहे. दंडातील रकमेतील 3 रुपये ग्राहकाच्या पिशवीसाठी, 1 हजार रुपये त्याने कोर्टात केलेल्या खर्चासाठी आणि ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल 3 हजार रुपये ग्राहकाला देण्यात यावेत असे ग्राहक कक्षाने म्हटले असून बाकीची 5 हजार रक्कम राज्य ग्राहक निवारण आयोगाच्या लीगल एड अकाऊंटमध्ये जमा करण्यात यावेत असेही निर्देश ग्राहक कक्षाने दिले.

बाटा कंपनीची तंतरली
ग्राहक हक्क कक्षाने बाटा कंपनीला बजावले की तुमच्याकडून ग्राहकाने वस्तू घेतली तर त्याला कागदी पिशवी मोफत देण्यात यावी. कंपनीने पर्यावरणाला योग्य अशा पदार्थांपासून बनलेल्या कागदी पिशव्या ग्राहकांना द्याव्यात असेही कक्षाकडून सांगण्यात आले. यामुळे बाटा कंपनीची चांगलीच तंतरली असून यापुढे या कंपनीने आपल्या सर्वच ग्राहकांना पिशव्या मोफत देण्याचे ठरवले आहे.

जाहिरात नसलेल्या पिशव्या द्याव्यात
कोणतीही कंपनी अथवा दुकानदार स्वतःच्या ब्रॅण्डचे नाव असलेली पिशवी ग्राहकांना देत असेल तर त्यासाठी ग्राहकांकडून जादा पैसे आकारणे चुकीचे आहे. ग्राहक संरक्षण कक्षाने दिलेला हा निर्णय अतिशय योग्य असून पैसे आकारायचेच असतील तर ग्राहकांना जाहिरात नसलेल्या कापडी आता कागदाची पिशवी द्यावी. या निर्णयाच्या आधारावर आता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षदेखील ग्राहकांकडून पिशवीसाठी जास्तीचे पैसे आकारणाऱया दुकानदारांविरोधात तक्रार करणार आहे, असे कक्षाचे अध्यक्ष ऍड.अरूण जगताप यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या