
सामना ऑनलाईन, गांधीनगर
गुजरातमधील सौराष्ट्रमधील वरिष्ठ नेते कुंवरजी बावलिया यांनी ३ जुलै रोजी काँग्रेसला राम राम ठोकला होता. पक्ष सोडल्यानंतर काही तासांतच ते भाजपमध्ये दाखल झाले, भाजपत प्रवेश करताच त्यांना मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. चौथ्यांदा आमदार झालेले कुंवरजी बावलिया हे अखिल भारतीय कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २००९ साली ते लोकसभेवर निवडून गेले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षांवर टीका करत आपण राहुल गांधीच्या जातीयवादी राजकारणाला कंटाळलो असल्याचे सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणांमुळे आपणाला प्रेरणा मिळाली म्हणून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांनी सांगितले.
बावलिया काँग्रेस सोडून भाजप मध्ये येण्याचे आधीच ठरले होते. २४-२५ जूनला भाजपच्या चिंतन शिबीरात भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री रुपाणी यांची बावलिया सोबत महत्त्वाची बैठक पार पडली होती. रुपाणी विदेश दौर्यात परतल्यावर बावलियांचा प्रवेश नक्की झाला होता.
गेल्या आठवड्यात बावलिया यांनी राहुल गांधीची भेट घेतली होती. गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने ते नाराज होते. मंत्रीपदासाठी त्यांनी पक्ष सोडल्याची टीका काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी केली आहे. चावडा म्हणाले की “बावलिया यांनी जनतेचा विश्वासघात केला असून जसदान पोटनिवडणूकीत त्यांना हरवून जनताच त्यांना धडा शिकवेल.”
बावलिया यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये येताच मंत्रिपदाच्या पायघड्या घातल्याने भाजपमधील निष्ठावंत नाराज झाले आहेत. भाजप आमदार मधू श्रीवास्तव यांनी जाहीरपणे त्यांची नाराजी व्यक्त करत म्हटलंय की “जर मला मंत्रीपद नाही मिळाले तर आम्ही हनुमान मंदिरात चिपळ्या वाजवू.” त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. श्रीवास्तव यांना आपल्या विधानामुळे बराच वाद निर्माण झाल्याचं कळताच त्यांनी “मी कधी मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, भाजपमध्ये आलेल्या बावलिया यांचा मी आदर करतो आणि माझ्या वक्त्यव्याचा माध्यमांनी विपर्यास केला” अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला



























































