वर्ल्ड कपनंतरही हिंदुस्थानची धुवांधार फटकेबाजी, परदेशात आणि मायदेशात खेळणार पाच-पाच कसोटी

अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकानंतरही हिंदुस्थान संघाची फटकेबाजी सुरू राहणार आहे. बीसीसीआयने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी देताना वर्षभराचा भरगच्च कार्यक्रमही जाहीर केला आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हिंदुस्थानचा संघ मायदेशात पाच कसोटी, 3 वन डे आणि 8 टी-20 सामने खेळणार असून त्याचदरम्यान झिम्बाब्वेत पाच टी-20 तर ऑस्ट्रेलिया दौऱयात पाच कसोटींची मालिकाही खेळणार आहे.

बीसीसीआयने मायदेशात होणाऱया 2024-25 च्या हंगामातील बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना, इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होणार असल्याने पुणेकरांना क्रिकेटची पर्वणी मिळणार आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसाठी एकापाठोपाठ एक अशा तगडय़ा क्रिकेट मालिकांचा अनुभव घेता यणार आहे. बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे हिंदुस्थानच्या दौऱयावर येणार असून हिंदुस्थानी संघ झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या सर्व मालिकांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे, मात्र, अद्याप श्रीलंकेविरुद्ध होणाऱया मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

हिंदुस्थानचे परदेशी दौरे

टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर सर्वप्रथम हिंदुस्थान झिम्बाब्वे दौऱयावर जाणार असून, 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेला 6 जुलै रोजी हरारे येथील सामन्याने सुरुवात होईल. त्यानंतर हिंदुस्थान पुन्हा श्रीलंकेच्या दौऱयावर जाणार असून तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे, मात्र अद्याप या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यानंतर हिंदुस्थान हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून या मालिकेला 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे होणाऱया पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात होणार आहे.

हिंदुस्थानच्या दौऱयावर न्यूझीलंड, इंग्लंड

टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे हिंदुस्थानच्या दौऱयावर येणार आहे. सर्वप्रथम हिंदुस्थान संघ घरच्या मैदानावर बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे.

महाराष्ट्रासाठी लॉटरी; पुणेकर आणि मुंबईकरांची चांदी

मायदेशात होणाऱया न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या मालिकेतील काही सामने हे पुणे आणि मुंबई येथे रंगणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 24 ते 28 ऑक्टोबरदरम्यान न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना रंगेल तर 1 ते 5 नोव्हेंबरदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. 2025 च्या सुरुवातीला इंग्लंड संघ हिंदुस्थान दौऱयावर येणार आहे. या दौऱयात 31 जानेवारी रोजी पुण्यात टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी टी-20 मालिकेतील पाचवा सामना मुंबईत खेळला जाईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे.

टी-20 विश्वचषकानंतर झिम्बाब्वे दौरा

टी-20 विश्वचषक स्पर्धेची रणधुमाळी संपल्यानंतर हिंदुस्थानी संघ झिम्बाब्वेच्या दौऱयावर जाणार असून पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 6, 7, 10, 13 आणि 14 जुलै रोजी टी-20 सामने रंगणार आहे. हे सर्व सामने हरारे येथील मैदानावर रंगणार आहेत.

नववर्षाचे स्वागत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेने

सरत्या वर्षाच्या अखेरीस हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात हिंदुस्थानी संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान रंगणाऱया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची पर्थपासून सुरूवात होईल. त्यानंतर अॅडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे कसोटी खेळल्या जातील.

हिंदुस्थानी संघाचे 2024-25 हंगामाचे मायदेशातील वेळापत्रक
बांगलादेश दौरा
कसोटी मालिका ः पहिली कसोटी – 19-23 सप्टेंबर, चेन्नई. दुसरी कसोटी – 27 सप्टेंबर, कानपूर.
टी-20 मालिका ः पहिली टी-20 – 6 ऑक्टोबर, धरमशाला, दुसरी टी-20 – 9 ऑक्टोबर, दिल्ली, तिसरी टी-20 – 12 ऑक्टोबर, हैदराबाद.
न्यूझीलंड दौरा ः पहिली कसोटी (बंगळुरू) 16 – 20 ऑक्टोबर, दुसरी कसोटी (पुणे) 24-28 ऑक्टोबर, तिसरी कसोटी (मुंबई) 1-5 नोव्हेंबर.
इंग्लंड दौरा ः टी-20 मालिका – पहिली टी-20 – 22 जानेवारी, चेन्नई, दुसरी टी-20 – 25 जानेवारी, कोलकाता, तिसरी टी-20 – 28 जानेवारी, राजकोट, चौथी टी-20 – 31 जानेवारी, पुणे, पाचवी टी-20 – 2 फेब्रुवारी, मुंबई. एकदिवसीय मालिका ः पहिली वन डे – 6 फेब्रुवारी, नागपूर. दुसरी वन डे – 9 फेब्रुवारी, कटक. तिसरी वन डे – 12 फेब्रुवारी, अहमदाबाद.