ICC T20 WC 2026 – बीसीसीआयने तिजोरी उघडली; विश्वविजेत्यांना 131 कोटींचे बक्षीस जाहीर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचे वर्ल्डकप विजेते खेळाडू मालामाल होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप उंचावणाऱ्या हिंदुस्थानी संघावर बीसीसीआयने पैशांचा पाऊस पाडला आहे. विश्वविजेत्यांसाठी बीसीसीआयने तिजोरी उघडली असून तब्बल 131 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने न्यूझीलंडला 96 धावांनी धूळ चारत हिंदुस्थानने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. हिंदुस्थानच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी हिंदुस्थानच्या संघाला 131 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.

याआधी 2024 मध्ये हिंदुस्थानने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी बीसीसीआयने हिंदुस्थानच्या संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यंदा या बक्षिसाच्या रकमेमध्ये 6 कोटींची वाढ करण्यात आली आहे.

Victory Parade In Mumbai- 2007, 2024 आणि आता 2026… इतिहासाची पुनरावृत्ती! विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, BCCI ची भूमिका काय?

दरम्यान, हे बक्षीस केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर सपोर्ट स्टाफ आणि निवड समिती सदस्यांसाठीही असणार आहे.

3 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस

टीम इंडियाला विश्वविजेते बनल्याबद्दल आयसीसीकडून 3 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी चलनात सुमारे 27.48 कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम मागील विश्वचषकाच्या तुलनेत 4 कोटींनी अधिक आहे. तर उपविजेते न्यूझीलंडला 14.65 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. याच बरोबर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या सेमी फायनल आणि सुपर 8 मधील संघांनाही बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. उपांत्य फेरीतील पराभूत संघ इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना प्रत्येकी 7.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर सुपर 8 मध्ये बाद झालेल्या झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला प्रत्येकी 3.48 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याचबरोबर साखळी फेरीत बाद झालेल्या ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई, यूएसए, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नेपाळ, आयर्लंड, इटली, ओमान आणि नामीबिया या 12 संघांना प्रत्येकी 2.29 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

फायनलमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी अभिषेकने वापरला खास ‘टोटका’, उधारीच्या बॅटनं गाजवलं मैदान; नेमकं काय घडलं?