नव्या प्रायोजकासाठी बीसीसीआय सज्ज, बोली लावण्यासाठी दिग्गजांना निमंत्रण

फॅण्टसी स्पोर्ट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ड्रीम 11 ने करार मागे घेतल्यानंतर बीसीसीआयने मंगळवारी राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी बोली लावण्यासाठी दिग्गज कंपन्यांना निमंत्रण धाडले आहे. मात्र या बोलीसाठी केंद्र सरकारने निर्बंध लादलेल्या अर्थातच प्रत्यक्ष पैशांवर आधारित ऑनलाइन गेमिंग व क्रिप्टोकरन्सी कंपन्यांना दूर ठेवण्यात आल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

बीसीसीआयने मुख्य प्रायोजकासाठी आपली प्रक्रिया सुरू केल्यामुळे 9 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणाऱया आशिया कपमध्ये हिंदुस्थानचा संघाच्या जर्सीवर कोणत्याही प्रायोजकाचे नाव नसेल. कारण मुख्य प्रायोजकासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग अधिनियम 2025 लागू केल्यामुळे बीसीसीआयला ड्रीम 11 शी असलेला करार संपुष्टात आणावा लागला होता. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइन मनी गेमिंग सेवा पुरवणे, प्रोत्साहित करणे किंवा त्याची जाहिरात करणे शक्य होणार नाही.

ड्रीम 11 आणि माय 11 सर्कल यांच्याशी बीसीसीआयने जवळपास 1,000 कोटी रुपयांचा करार केला होता, मात्र नव्या निविदेनुसार, कोणताही बोली लावणारा किंवा त्यांच्या गटातील कंपनीने ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगाराशी संबंधित सेवा न पुरवणे आवश्यक आहे. बीसीसीआयच्या लिलावात भाग घेण्यासाठी अर्ज खरेदीची शेवटची तारीख 12 सप्टेंबर असून, बोली सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर निश्चित केली आहे.

300 कोटींची वार्षिक उलाढाल आवश्यक

बीसीसीआयने निविदेत बोली लावणाऱ्या कंपन्याना ‘सरोगेट ब्रॅण्डिंग’चा वापर न करण्याचे बंधन घातले आहे. म्हणजे इतर नाव, लोगो किंवा ओळख वापरून अप्रत्यक्षरीत्या बोली लावण्यासही मनाई असेल. आर्थिक पात्रतेनुसार, मागील तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल किंवा निव्वळ संपत्ती किमान 300 कोटी रुपये असलेल्या कंपन्याच या निविदा प्रक्रियेत आपले नाव नोंदवू शकतात. मात्र बीसीसीआयचा नवा प्रायोजक हा हिंदुस्थान उद्योग विश्वातील कुणी दिग्गज असेल, ज्याची वार्षिक आर्थिक उलाढाल किमान दहा हजार कोटींपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आतापासून वर्तवला जात आहे.