बीसीसीआय-आयसीसीमध्ये वॉर! दरवर्षी होणाऱ्या ‘वर्ल्ड कप’ आयोजनाच्या प्रस्तावाला विरोध

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप दरवर्षी आणि वन डे वर्ल्ड कपचे दर तीन वर्षांनी आयोजन करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ठेवला आहे. 2023 ते 2028 पर्यंत प्रक्षेपण हक्कातून मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने ‘आयसीसी’ने हा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने ‘आयसीसी’च्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या नव्या पदाधिकाऱ्यांना सर्वप्रथम आपली शिखर संघटना असलेल्या ‘आयसीसी’शी द्वंद्व करावे लागणार आहे. कारण ‘आयसीसी’च्या या प्रस्तावाचा ‘बीसीसीआय’च्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे.

सध्या दर चार वर्षांनी वन डे वर्ल्ड कप, तर दर दोन वर्षांनी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येत आहे. ‘आयसीसी’ आणि सलग्न राष्ट्रीय संघटना पाच वर्षांचे वेळापत्रक बनवत असते. या वेळापत्रकानुसारच द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे नवनिर्वाचित अध्यक्ष होणाऱ्या सौरभ यांना सलामीलाच ‘आयसीसी’च्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 2020मध्ये ऑस्ट्रेलियात आगामी टी-20 वर्ल्ड कप होणार असून वन डे वर्ल्ड कप 2023 ला हिंदुस्थानमध्ये होणार आहे. 2023 नंतर पुढील पाच वर्षांसाठी ‘आयसीसी’चे वेळापत्रक तयार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘बीसीसीआय’चे सीईओ राहुल जोहरी यांनी वर्ल्ड कप संदर्भातील नव्या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी ‘आयसीसी’चे ‘सीईओ’ मनु साहनी यांना ई-मेल करून नकाराची सर्व कारणे कळविली आहेत.

 तर महसूल घटणार!

समजा ‘आयसीसी’च्या प्रस्तावानुसार दरवर्षी टी-20 वर्ल्ड कप व दर तीन वर्षांनी वन डे वर्ल्ड कपला हिरवा कंदील मिळाला. स्टार स्पोर्टस्, सोनी टीव्ही, रेडिओ व डिजिटल प्रक्षेपण यासाठीचे बजेट 100 कोटी रुपये आहे. ‘आयसीसी’ला प्रक्षेपण हक्काच्या बदल्यात 2023-2028 दरम्यानच्या कालावधीसाठी या क्रीडा वाहिन्यांकडून 60 कोटी रुपये मिळणार. ‘बीसीसीआय’ प्रक्षेपण हक्कासाठी बाजारात येणार तेव्हा या वाहिन्यांच्या शंभर कोटी बजेटमधील 60 कोटी रक्कम आधीच ‘आयसीसी’कडे गेल्याने ‘बीसीसीआय’साठी फक्त 40 कोटी रुपयेच उरलेले असणार. याचाच अर्ध ‘बीसीसीआय’च्या महसुलात मोठी घट होणार हे उघड आहे.

आपली प्रतिक्रिया द्या