आयपीएलची चर्चा आता नको! बीसीसीआयकडून मात्र वेट ऍण्ड वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता आगामी महिन्यांमध्ये येथे आयपीएलचे आयोजन करता येणार नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र बीसीसीआयने यावर वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेतली असून सध्या तरी आयपीएलची चर्चा नकोय असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

आमच्याकडे स्पर्धा खेळवू शकता – शमी सिल्वा
हिंदुस्थानच्या तुलनेत श्रीलंकेत कोरोनाग्रस्त कमी आहेत. त्यामुळे आमच्या येथील परिस्थिती हिंदुस्थानपेक्षा लवकर नियंत्रणात येईल. त्यामुळे आयपीएल स्पर्धा आमच्याकडे खेळवू शकता, असे स्पष्ट मत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी यावेळी व्यक्त केले.

आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी
हिंदुस्थानचा संघ जुलै महिन्यात श्रीलंकन दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात दोन देशांमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांच्या टी-20 व वन डे मालिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्थात ही मालिकाही कोरोना व्हायरस किती नियंत्रणात आहे यावरच अवलंबून असेल. मात्र आयपीएल श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घेतल्यास श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. त्यामुळे ते प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आयपीएल जर लंकेत खेळवण्याचा निर्णय घेतला, तर कॅण्डी, गॉल व प्रेमदासा या तीन स्टेडियम्सवर लढती खेळवाव्या लागणार आहेत.

इतरत्रही होऊ शकते स्पर्धा
आयपीएलमुळे मिळणाऱया नफ्यामुळे बीसीसीआय या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मात्र तसे झाल्यास श्रीलंकेसह इतर देशांमध्येही ही स्पर्धा खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येऊ शकतो. शशांक मनोहर आयसीसीच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर हिंदुस्थानचे इतर देशांसोबत कसे संबंध तयार होताहेत यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.