
वरळी बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान मोठ्या घराचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील डी आणि ई या दोन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. त्यामुळे फेज 1 अंतर्गत तयार झालेल्या 556 लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळावा आणि आठडाभरात चावी वितरण आयोजित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), नेते, युवासेनाप्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
‘माझ्या मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1 अंतर्गत 556 घरे पूर्णतः तयार झालेली आहेत. ही घरे लॉटरीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी सज्ज असून, लाभार्थ्यांना मनःपूर्वक वाटते की लवकरात लवकर चाव्यांचे वितरण झाले पाहिजे, जेणेकरून ते येणारा गणेशोत्सव आपल्या नवीन घरी साजरा करू शकतील. हे लाभार्थी अजून किती दिवस भाड्याच्या घरात किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणार? या प्रकल्पांतर्गत नवीन घरे वितरित झाल्यानंतर ट्रान्झिट कॅम्प रिकामे होतील. त्यामुळे पुढील लाभार्थ्यांना तेथे स्थलांतर करता येईल आणि त्यामुळे संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास चालना मिळेल. त्यामुळे येत्या आठवड्यात फेज 1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित करावा’, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.
बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज १ अंतर्गत पूर्ण तयार झालेल्या ५५६ घरांच्या लाभार्थ्यांना ताबा मिळावा, ह्यासाठी येत्या आठवडाभरात चावी विरतण कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी पत्राद्वारे सन्मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांच्याकडे केली. pic.twitter.com/LTIzcXqCA3
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 30, 2025
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील एकूण 8 विंगपैकी डी आणि ई या दोन इमारतींना ओसी मिळाली आहे.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला मोठे यश
- शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता.
- डिसेंबरपर्यंत वरळी बीडीडी चाळीतील 1690, नायगाव बीडीडी चाळीतील 1400 आणि ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 342 रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.





























































