
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दरमहा 30 भाडे देण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. सद्यस्थितीत बीडीडीतील रहिवाशांना म्हाडाकडून दरमहा 25 हजार भाडे देण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेता भाडेवाढ करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार म्हाडाकडे करण्यात येत होती.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे.
म्हाडाकडे संक्रमण शिबिरांची कमतरता असल्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांना दरमहा 25 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय देण्यात आला आहे. 2022 सालापासून ते आजतागायत या भाडय़ात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सध्याची वाढलेली महागाई आणि त्यातच ठिकठिकाणी विकासकामे सुरू असल्याने एवढय़ा तुटपुंज्या भाडय़ात घर मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे किमान 30 हजार रुपये भाडे देण्यात यावे, अशी रहिवाशांनी मागणी केली होती. रहिवाशांच्या या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे बीडीडीवासीयांचे लक्ष लागले आहे.




























































