घरकुलाच्या लाभासाठी लाच घेतांना गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापूर

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील घरकुलाच्या प्रपत्र ड मधून ब यादीमध्ये नाव घेण्यासाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा क्रॉस चेकींगचे अधिकारी बालाजी मारुतराव गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील तक्रारदार, त्याचे वडील व भाऊ या तिघांच्या नावाने घरकुलाच्या प्रपत्र ड यादीमध्ये नावे आली होती. कळमनुरी पंचायत समितीचे अतिरिक्त शिक्षण विस्तार अधिकारी यांची खरवड येथील घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या यादीची क्रॉस चेकींग घरकुल सर्व्हेकरीता बालाजी गोरे यांची नेमणूक करण्यात आली होती. तक्रारदारासह त्याचे वडील व भावाची नावे लाभार्थ्यांच्या ’ड’ यादीतून ’ब’ यादीत घेण्यासाठी व पहिल्या यादीत अनुदान मिळेल असे आमीष दाखवुन १५ हजार रुपयांची लाचेची मागणी बालाजी गोरे यांनी केली होती.

तक्रारदाराला ही मागणी मान्य नसल्याने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधुन त्यांना माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी आखाडा बाळापुर येथील हॉटेल तुळजाई येथे तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेतांना एसीबीच्या पथकाने बालाजी गोरे यास रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी रवींद्र थोरात, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील यांच्यासह अभिमन्यू कांदे आदींनी केली.