
‘‘इराण युद्धामुळे ओढवलेले जागतिक संकट गहिरे आहे. हे संकट बराच काळ राहण्याची शक्यता आहे. काळ कठीण आहे. त्यामुळे सर्वांनी मनाची तयारी करा. कोविडसारख्या संकटाला तोंड द्यायला तयार राहा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केले. नोटबंदी आणि कोविड लॉकडाऊन काळात अचानक निर्णय घेऊन देशाला धक्के देणाऱया मोदींच्या आजच्या आवाहनामुळे लोकांच्या पोटात गोळा आला आहे. हे भाषण म्हणजे भविष्यातील महागाईचे संकेत तर नाहीत ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
इराण युद्ध सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी देशातील इंधन टंचाई आणि हिंदुस्थानच्या भूमिकेवर मौन बाळगले होते. मोदींनी मौन सोडावे आणि भूमिका स्पष्ट करावी. देशातील परिस्थितीची माहिती द्यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. विरोधकांच्या दबावानंतर अखेर आज मोदींनी लोकसभेत निवेदन केले. देशातील इंधन व खतांची टंचाई, आखाती देशातील हिंदुस्थानींची सुरक्षेच्या प्रश्नावर मोदींनी भाष्य केले. आखातातील परिस्थिती चिंताजनक आहे. हिंदुस्थानला याचा कमीत कमी फटका बसेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोना काळातही आपण अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो होतो. आताही तयार राहायला हवे,’’ असे मोदी म्हणाले.
हे युद्ध आपल्यासाठी जास्त चिंताजनक
‘‘आखाती देशात सुमारे 1 कोटी हिंदुस्थानी राहतात किंवा काम करतात. त्यामुळे हे युद्ध आपली चिंता वाढवणारे आहे. जगातील सर्वच देश युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हिंदुस्थानही इराणसह आखाती देशांच्या संपर्कात आहे,’’ असे मोदींनी सांगितले.
इस्रायल आणि अमेरिकी हल्ल्यांबाबत मौन
अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांबाबत मोदींनी आपल्या भाषणात मौन बाळगले. इराणच्या मिनाब शहरातील शाळेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात 160 निष्पाप मुलींचा मृत्यू झाला होता. जगभरातून याचा निषेध करण्यात आला. मोदींनी आजच्या भाषणात यावर चकार शब्द काढला नाही.
हे मोदी संकट आहे! – संजय सिंह
‘ज्या संकटाबद्दल मोदी बोलत आहेत, ते त्यांनीच आणले आहे. हे मोदी संकट आहे. तरीही आम्ही आता सरकारच्या सोबत आहोत. इराणच्या अध्यक्षांशी चर्चा करा असा सल्ला आम्ही दिला होता. मात्र मोदी आमचे ऐकतच नाहीत,’ अशी टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली.



























































