
कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यात घोंगावत असताना शासनाने कडक निर्बंध लावले. त्यामुळे मोजक्या लोकांमध्ये विवाह सोहळा पार पाडण्याचे निर्देश असताना येथील लाड-कुलकर्णी कुटुंबाने हे नियम पाळत आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी कोरोनाच्या जनजागृतीपर मंगलाष्टके म्हणत ‘बी पॉझिटिव्ह’चा संदेश समाजाला दिला आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून संकटाचे वातावरण असताना नैराश्य सर्वत्र निर्माण झाले आहे.अवघ्या 25 लोकांमध्ये विवाह सोहळा पार पाडण्याचे निर्देश असल्याने विवाह सोहळेही बंद झाले आहेत. परंतु या नैराश्याच्या काळातही लाड कुटुंबाने पाऊल उचलत वधूला येवल्यात आणून विवाह पार पाडला. लाड कुटुंबातील शिक्षक असलेले शैलेश लाड यांचा मुलगा तेजस व संभाजीनगर येथील लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी कन्या पूनम यांचा शुभविवाह शासकीय नियमांचे पालन करत सोमवारी लाडवाडय़ात संपन्न झाला.
शुभविवाह संपन्न होत असताना नेहमी जे मंगलाष्टक लग्नकार्यात म्हटले जाते ते न म्हणता कोरोनावर जनजागृतीपर असे मंगलाष्टक गुरुजींनी म्हणून हा शुभविवाह संपन्न केला. यावेळी लाड व कुलकर्णी कुटुंबाने मंडपात कोरोना जनजागृतीचे विविध संदेश फलक लावले होते. ‘कोरोनाला हरवूया, देशाला वाचवूया’, ‘झाली जरी सर्दी, असे विविध कोरोना जनजागृती फलक लग्न मंडपात लावून शुभविवाह हा कोरोना जनजागृतीपर मंगलाष्टके म्हणत पार पडला.

























































