गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नका, अशा सूचना मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकानी शाळांना दिल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची मागणी केली होती.
यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून अनंत चतुर्दशी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नका, अशा सूचना सर्व शाळांना देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवसेनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्याकडे केली होती. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शशिकांत झोरे यांनी मुंबई विभागीय शिक्षण संचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन थोडयाच दिवसात येऊ घातलेल्या गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांचा लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नये, अशा सूचना शाळांना देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत सांगावे यांनी सर्व शाळांना गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नये असे आदेश दिले आहेत.