
गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील चार मुलांचा सिंदफणा नदीतील वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि.6 फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली होती. घटनेच्या 72 तासानंतर अखेर गेवराई ठाण्यात सदोष मनुष्यवधासह वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शहाजानपूर (चकला) येथील ग्रा.पं.सेवक आसाराम पांडुरंग इनकर यांनी 9 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास फिर्याद नोंदवली.
पांडुरंग भीमराव चोरमले, विलास वामन निर्मल, संदीप निर्मल आणि अर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी ता.जि.बीड) यांचा आरोपीत समावेश आहे. या चौघांनी त्यांच्या जेसीबीने अवैध वाळू उपसा करून ती वाळू ट्रॅक्टर, हायवाने विक्री करण्याचा अवैध व्यवसाय सुरू केला होता. मात्र नदीपात्रात केलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये पडून कोणाचा जीव जावू शकतो याची जाणिव असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच 6 फेब्रुवारी रोजी अवैध वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून गणेश बाबू इनकर (8), आकाश राम सोनवणे (10), बबलू गुणाजी वक्ते (11, सर्व रा.शहाजानपूर चकला) व अमोल संजय कोळेकर (रा.तांदळवाडी, ता.बीड) या चार मुलांचा मृत्यू झाला. यावरून चारही आरोपींविरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक संदीप काळे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या दोषींवर ठोस कारवाई करणार असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले होते.